तपासासाठी लागणाऱ्या बाबींचा खर्च स्वत:च्या खिशातून; फंड मिळत नसल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:10 IST2025-11-18T10:09:58+5:302025-11-18T10:10:10+5:30
संबंधितांकडून तपास फंडासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे

तपासासाठी लागणाऱ्या बाबींचा खर्च स्वत:च्या खिशातून; फंड मिळत नसल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी हतबल
पुणे : पोलिस ठाण्यांचा, तपासासाठी लागणाऱ्या बाबींचा खर्च हा पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वत:च्या खिशातून भागवावा लागत आहे. खिशातून गेलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी आमची तपास फंडाची बिले मंजूर करा, अशी मागणी विभागीय प्रशासनाकडे करण्याची वेळ आली आहे. संबंधितांकडून तपास फंडासाठी निधीच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी तसेच अन्य तपासकामांसाठी संबंधित पोलिसांचे पथक स्वखर्चाने विविध ठिकाणी प्रवास करते. त्यावेळी कार, जेवण, नाश्ता व प्रवासासह अन्य खर्च तपास अधिकाऱ्याला करावा लागतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून न्यायालयात हजर करणे तसेच चार्जशीट करेपर्यंतच्या खर्चाची जुळवाजुळव संबंधित तपास अधिकाऱ्यालाच करावी लागते. जीएसटीसह बिले सादर केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.