थंडीचा कडाका वाढला; पुणेकर गारठले! पुढील २ ते ३ दिवसांत तापमानात होणार 'हे' बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:02 IST2025-11-17T11:59:37+5:302025-11-17T12:02:33+5:30
शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव हुडहुडी कायम आहे

थंडीचा कडाका वाढला; पुणेकर गारठले! पुढील २ ते ३ दिवसांत तापमानात होणार 'हे' बदल
पुणे: शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेत गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव हुडहुडी कायम आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात रविवारी (दि. १६) मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शहरातील पाषाण परिसरात १०.१ आणि शिवाजीनगर परिसरात १०.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गारठा वाढला आहे. पुणे आणि परिसरात सोमवारी (दि. १७) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे तर मंगळवारपासून पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः स्वच्छ राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात बोचरी थंडी जाणवत आहे. पुण्यातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. थंडीमुळे रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
पुण्यातील रविवारचे किमान तापमान
वडगावशेरी : १६.६
लवळे : १६.४
चिंचवड : १५.३
कोरेगाव पार्क : १४.७
भोर : १३.७
दौंड : ११.१
बारामती : १०.५
पाषाण : १०.१
माळीण : ९.९
हवेली : ८.६