आळंदी : पाहूनी समाधीचा सोहळा ! दाटला इंद्रायणीचा गळा !! बाळ सिद्ध पाहता चिमुकला ! कुणी गहिवरे कुणी हळहळे ! भाळी लावून चरण रजाला ! चरणावरी लोळला !!चोखा गोरा आणि सावता ! निवृत्ती हा उभा एकटा! सोपानासह उभी मुक्ता आश्रपूर लोटला !! ''ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम''.... असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष... दुपारचे बारा वाजले आणि घंटानाद... समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊलीं’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्रीं’चे दर्शन घेतले. 'तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन सुरु झाले. यावेळी विनामंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. दरम्यान मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ - मृदुंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत विना मंडपातून कारंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करून ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'' अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला. संत श्री. नामदेव महाराजांच्या वंशजांनी टाळ - मृदुंगाच्या निनादात नामदेव महाराजांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार केला. यावेळी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता विना मंडपात ह.भ.प. सोपानकाका महाराज देहूकर यांचे हरीकीर्तन झाले. रात्री उशिरा ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात देवस्थानच्या वतीने नारळ - प्रसाद वाटून त्रयोदशीची सांगता करण्यात आली.
Web Summary : Alandi witnessed Sant Dnyaneshwar's 729th Sanjeevan Samadhi anniversary with spiritual fervor. Devotees thronged to offer prayers, as the Samadhi was showered with flowers amidst chants and devotional programs. The event included kirtans and processions, concluding with distribution of prasad.
Web Summary : आलंदी में संत ज्ञानेश्वर का 729वां संजीवन समाधि दिवस श्रद्धापूर्वक मनाया गया। समाधि पर फूलों की वर्षा की गई, भक्तों ने प्रार्थनाएँ कीं, और कीर्तन एवं जुलूस सहित भक्ति कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम का समापन प्रसाद वितरण के साथ हुआ।