पुणे : इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकियांनीही इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला. त्यांचा इतिहास डिलीट करण्याचे काम झाले. त्यामुळे मुघलांनंतर देशात इंग्रज आले, असे अनेकांना वाटते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आपल्या नायकांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे साकारलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला एकत्र करून मुघल साम्राज्याच्या चारही आक्रमकांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी फुलविलेल्या स्वराज्याच्या अंगारामुळे अनेक पराक्रमी योद्धे तयार झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला विस्तारीत करण्याचे काम श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांनी लढलेल्या ४१ लढायांपैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. वेग ही त्यांची सर्वांत मोठी रणनीती होती. युद्धासाठी मुघलांची सेना जेव्हा ८ ते १० कि. मी. प्रवास करत असे, तेव्हा बाजीरावांची सेना ६० ते ८० कि. मी.चा प्रवास दररोज करत असे. पालखेड येथे झालेल्या युद्धाचा उल्लेख रणनीतीनुसार सर्वांत चांगली लढाई होय, असा माँटगोमेरी यांच्यासारख्या सेनानींनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा गौरव केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.