पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 08:06 IST2025-10-09T08:05:36+5:302025-10-09T08:06:08+5:30
ही कारवाई रात्री उशिरा सुरू झाली आणि पहाटेपर्यंत सुरुच होती. राज्य दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी मोठी गुप्तता बाळगत ही मोहीम हाती घेतल्याचे समजते

पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
पुणे - शहरात पुन्हा एकदा दहशतवादी हालचालींचा संशय निर्माण झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात मध्यरात्रीपासून एटीएस आणि पुणे पोलिसांनी संयुक्त सर्च ऑपरेशन राबवले. तब्बल १८ संशयित इसमांचा शोध सुरू असल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यातील काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याचीही माहिती आहे.
ही कारवाई रात्री उशिरा सुरू झाली आणि पहाटेपर्यंत सुरुच होती. राज्य दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी मोठी गुप्तता बाळगत ही मोहीम हाती घेतल्याचे समजते. या कारवाईमुळे राज्यभरातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी याच कोंढवा परिसरातून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचे तिघे जण पकडले गेले होते. त्यावेळी या तिघांच्या माध्यमातून देशातील मोठा दहशतवादी कट उधळण्यात पोलिसांना यश आले होते. आता पुन्हा एकदा त्याच भागात तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाल्याने कोंढवा पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयितांच्या हालचालींवर गुप्तचर विभागाने नजर ठेवली होती. या माहितीच्या आधारेच एटीएसने मध्यरात्री अचानक कारवाईचा निर्णय घेतला. सध्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.