केडगाव (दौंड) : खुटबाव ता. दौंड येथील सृष्टी रामा होनमाने या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करीत दहावीमध्ये ९५.८० टक्के गुण मिळवून भैरवनाथ विद्यालय खुटबाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वडील टेम्पो चालक असून आई मोलमजुरी करून घरातील तीन भावंडांचे शिक्षण करीत आहेत.
लहानपणापासूनच बेताची परिस्थितीचा अनुभव सृष्टीने घेतला होता. वडील रामा होनमाने खुटबाव येथील खासगी कंपनीमध्ये टेम्पो चालवतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. आई उज्वला येथील ओम चिक्स कंपनीमध्ये मजुरी करते. खुटबाव येथील रमेशनगर मध्ये दहा बाय दहा एवढ्या छोट्या खोलीमध्ये सगळे कुटुंब राहते. घरातील तीनही भावंडे येथेच अभ्यास करतात. गेल्या वर्षभरात एकही दिवस सृष्टी व तिच्या भावंडांनी टीव्ही पाहिलेला नाही. बहीण श्रेया व भाऊ श्रवण हे दोघेही आपापल्या वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावतात. सृष्टीने पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण खुटबाव येथील प्राथमिक शाळेत घेतले आहे. माध्यमिक शिक्षणासाठी भैरवनाथ विद्यालयात प्रवेश घेतला. शालांत परीक्षेमध्ये प्रशस्तीपत्र सृष्टीने पटकावले आहे. सुंदर हस्ताक्षरात तिचा नेहमी पहिला क्रमांक असतो. नुकत्याच महाराष्ट्र शिक्षण मंडळाने घेतलेल्या शालांत परीक्षेमध्ये सृष्टीने घवघवीत यश संपादन करीत आई व वडिलांचे नाव रोशन केले आहे. त्यांच्या कुटुंबाला ओम चिक्सचे मालक राजेंद्र थोरात तसेच नाना फरतडे, रत्नदीप फरतडे यांचा कायम पाठिंबा असतो. माजी आमदार रमेश थोरात, भैरवनाथ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे, खजिनदार अरुण थोरात, सचिव सूर्यकांत खैरे, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र जगताप व सर्व शिक्षकवृंदांनी सृष्टीचे कौतुक केले.