शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:53 IST2025-05-01T14:53:11+5:302025-05-01T14:53:43+5:30
भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले

शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज
शिरूर/शिक्रापूर : तालुक्यातील करडे येथील तलाठी यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने व त्यांना पोहता येत नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पवन अशोक बांदल (३१, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह मंगळवारी (दि. २९) सकाळी त्यांच्याच करडे येथील शेतातील विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणी मृत पवन बांदल यांचे बंधू श्रीनिवास अशोक बांदल यांनी शिरूर पोलिसांना खबर दिली होती. यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बांदल हे गेल्या सात महिन्यांपासून पाबळ येथे गावकामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. पवन बांदल हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पाबळ येथे जाण्यास निघाले असता त्यांचे भाऊ श्रीनिवास यांनी ‘जाताना आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंप चालू करून जा’, असे सांगितले. त्यास होकार देऊन ते निघून होते. दरम्यान, श्रीनिवास हे बारा वाजण्याच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले असता शेतात पाणी न आल्याने ते स्वत: विहिरीकडे गेले. तेव्हा विहिरीच्या कडेला पवन यांची दुचाकी लावलेली होती व दुचाकीवर त्यांच्या लॅपटॉपची बॅगदेखील ठेवलेली आढळून आली. विहिरीत पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी सरोदे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार राजेंद्र बनकर करीत आहेत.