आईच्या अनैतिक संबंधांचा संशय; मुलाकडून युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या, पुणे जिल्ह्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:44 IST2025-08-15T12:43:50+5:302025-08-15T12:44:19+5:30
मुलाने संतापाच्या भरात युवकाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवला

आईच्या अनैतिक संबंधांचा संशय; मुलाकडून युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या, पुणे जिल्ह्यात खळबळ
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात गुरुवारी (14 ऑगस्ट) उशिरा रात्री घडलेल्या एका खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. आईच्या कथित अनैतिक नात्याच्या संशयातून मुलाने एका युवकावर कोयत्याने वार करत जागीच ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे 11:45 वाजता घडली. प्रवीण दत्तात्रय पवार यांच्यावर विशाल उर्फ नण्या किसन थोरात (रा. इंदिरानगर, दौंड) याने कोयत्याने जीवघेणे हल्ले केले. आरोपीला राग होता की, त्याच्या आईचे पवार यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत. संतापाच्या भरात थोरात याने पवार यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवला.
या घटनेची फिर्याद नितीन अशोक गुप्ते (वय 41, व्यवसाय – भाजी विक्री) यांनी दौंड पोलिस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 103 (नवीन क्रिमिनल कोडनुसार खून) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.