मध्यप्रदेशच्या 'उमरटी’तून महाराष्ट्रात १००० पिस्तूलांचा पुरवठा! आंदेकर टोळीने आणले १५ पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 21:09 IST2025-11-27T21:08:29+5:302025-11-27T21:09:38+5:30
पुणे पोलिसांनी आता महाराष्ट्रात पिस्तूलांची विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे मोठे ऑपरेशन सुरू केले आहे

मध्यप्रदेशच्या 'उमरटी’तून महाराष्ट्रात १००० पिस्तूलांचा पुरवठा! आंदेकर टोळीने आणले १५ पिस्तूल
किरण शिंदे
पुणे : मध्यप्रदेश सीमेवरील उमराटी भागातील पिस्तूल कारखान्यांवर धडक मोहीम राबवल्यानंतर पुणेपोलिसांनी आता महाराष्ट्रात पिस्तूलांची विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांतील सर्व गुन्हेगार, सराईत, टोळ्यांच्या हालचालींची झाडाझडतीही पोलिसांनी सुरू केली आहे. याशिवाय उमरटीत अटक झालेल्या सात जणांची चौकशीही सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील ५ वर्षात महाराष्ट्रात अंदाजे १००० पिस्तूल उमरटी गावातून आल्याची शक्यता आहे. मात्र हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांत वाढलेल्या गोळीबाराच्या घटना, टोळी युद्धे, किरकोळ भांडणातही पिस्तूलांचा वाढलेला वापर या सर्वांच्या मागचा धागा अखेर उमरटीपर्यंत पोहोचला आहे. पिस्तूल कुठून येतात आणि कोणाला मिळतात? हा प्रश्न अनेक मोठ्या गुन्ह्यांनंतर गंभीरपणे समोर आला होता. पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांड, गणेश काळे खून,वनराज आंदेकर प्रकरण, शरद मोहोळचा खून याशिवाय आणखी काही गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल उमराटी गावात बनविलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात उमराटीत चार पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त केले, घराघरात बनविल्या जाणाऱ्या ‘भट्या’ नष्ट केल्या, सात जणांना अटक केली आणि दोन पिस्तूल, मॅगझिन, सुट्टे भाग आणि पिस्तूल बनविण्याची साधने जप्त केली आहेत.
आंदेकर टोळीने ‘उमरटी’तून आणले १५ पिस्तूल
शहरात धुमाकूळ घालणाऱ्या आंदेकर गायकवाड टोळी युद्धाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदेकर टोळीकडून तब्बल १५ पिस्तूल उमराटीतून आणली गेली, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यापैकी काही पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहेत; परंतु अजूनही काही पिस्तूल गायब आहेत. ही शस्त्रे सध्या कोणाकडे आहेत, कोणत्या गुन्ह्यात त्यांचा वापर झाला आहे, याचा बारकाईने तपास सुरू आहे.
उमरटीतील आरोपी आता पुण्यातील मोक्का प्रकरणातही आरोपी!
वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून झाला होता. त्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूलं उमराटीतून आरोपींनी पुरविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिस्तूल पुरवणाऱ्यांना देखील आयुष कोमकरसह इतर खून प्रकरणात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार आहे.