निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते; 'मी देखील काट मारणार' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:51 IST2025-11-24T12:51:08+5:302025-11-24T12:51:28+5:30
बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते

निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते; 'मी देखील काट मारणार' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे: बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते. त्यामुळे निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
पुणे स्टेशन येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकाऱ्यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तुम्ही मला १८ च्या १८ उमेदवार निवडून द्या, मी तुमची म्हणेल ती कामे करून देईन, तुम्ही जर तिथं काट मारली, तर मीदेखील काट मारणार, तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे तर माझ्या हातामध्ये निधी द्यायचा आहे. त्यामुळे बघा काय करायचं या विधानाबाबत पत्रकारांशी विचारले असता अजित पवार म्हणाले, बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते. त्यामुळे निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते असे म्हणत त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
ग्रामपंचायतीचे खुळ डोक्यातून काढा. माळेगाव नगरपंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे, हे पवारांनी स्पष्ट केले. "माळेगावकरांनो, तुमचं बजेट आहे फक्त पाच-सहा कोटी रुपयांचं. त्यात तुम्ही कितीही वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीचा विकास जसा हजारो कोटी आणून झाला, तीच गोष्ट आपल्याला माळेगावला करायची आहे." माळेगाव नगरपंचायत माझ्या विचारांची नसेल, तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल. तुम्ही आम्ही ज्या अठरा लोकांचे पॅनल उभं केलं आहे त्यांना निवडून द्या. मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला विकासाची काम करून देतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. कोणी संपत नसतं त्यामुळे संकुचित विचार ठेवू नका, मन मोठं करा. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काट मारली तर मी पण काट मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते. सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे," असे अजित पवार म्हणाले होते.