असा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळत नाही! आजीचे हरवलेले सोन्याचे दागिने विद्यार्थीनिने केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:46 IST2025-10-17T13:46:02+5:302025-10-17T13:46:31+5:30
आजींचा मुलगा दत्तात्रय वाकचौरे यांनी शाळेत येऊन दागिने घेतले आणि सोनाली आहिरे हिला शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रोख दोन हजार रुपये बक्षीस दिले

असा प्रामाणिकपणा सध्या पाहायला मिळत नाही! आजीचे हरवलेले सोन्याचे दागिने विद्यार्थीनिने केले परत
रांजणगाव सांडस: आलेगाव पागा (ता शिरूर) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता दहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी सोनाली आहिरे हिने प्रामाणिकपणे दीड तोळा सोने परत केले. अतिशय सामान्य कुटुंबात राहत असणारी परंतु मुळात अतिशय चाणक्ष, हुशार व प्रामाणिक गुण असणारी सोनाली हि विद्यालयात येत असताना भैरवनाथनगर ते आलेगाव पागा रस्त्यावर तिला दीड तोळा सोन्याचे दागिने रस्त्यावर सापडले. तीने शाळेत ते दागिने विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांच्याकडे सुपूर्द केले.
आलेगाव पागा येथील रहिवाशी विमल तुळशीराम वाघचौरे ह्या भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. घरी जात असताना त्यांच्या गळ्यातील दागिना रस्त्यावर पडला. घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. सगळीकडे शोध घेतला. परंतु कुठेच सापडत नाही. त्यावेळी सोनाली आहिरे या मुलीला समजल्यावर तीने तो दागिना मला रस्त्यावर सापडला आहे हे सांगितले. आणि मी तो शाळेत सरांकडे सुपूर्द केला आहे. आजींचा मुलगा दत्तात्रय वाकचौरे यांनी शाळेत येऊन दागिने घेतले आणि सोनाली आहिरे हिला शैक्षणिक साहित्य खरेदी साठी रोख दोन हजार रुपये बक्षीस दिले. व तिचा सन्मान शिरूर तालुका भाजपा युवक अध्यक्ष एकनाथ शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आजीना दागिने सुखरूप त्यांच्याकडे देण्यात आले. त्यावेळी त्यांना खूप आनंद झाला. याप्रसंगी प्राचार्य तुकाराम बेनके दत्तात्रय वाकचौरे, योगीराज मोरे, विलास वाघचौरे व सर्व शिक्षक उपस्थित होते.