कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धांदल

By Admin | Updated: June 12, 2015 06:06 IST2015-06-12T06:06:31+5:302015-06-12T06:06:31+5:30

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थी, तसेच पालकांची धावपळ सुरू आहे. योग्य कागदपत्रे मिळाल्यानंतर

Students hurry for papers | कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धांदल

कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांची धांदल

पिंपरी : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यासाठी विद्यार्थी, तसेच पालकांची धावपळ सुरू आहे. योग्य कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याची तपासणी करून घेण्यासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालय आणि केंद्रात फेऱ्या माराव्या लागत आहेत. वेळखाऊ संथ प्रक्रिया आणि धांदल यामुळे विद्यार्थी आणि पालक जाम वैतागले आहेत.
पहिल्या टप्प्यातील अपूर्ण राहिलेली माहिती भरली जात आहे. अर्जाची प्रिन्ट काढल्यानंतर त्याला आवश्यक कागदपत्रे जोडली जात आहेत. या कागदपत्रांचा संच संबंधित केंद्रातून तपासून घेतल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण होत आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. ही नोंदणी घरी किंवा सायबर कॅफेत केली जात आहे. त्याची प्रिन्ट पुन्हा संबंधित केंद्रात तपासली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज कन्फर्म करून सबमिट केला जात आहे.
जातीचा दाखला, गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, शिफारसपत्र आदीसाठी विद्यार्थी व पालकांना धावपळ करावी लागत आहे. महाविद्यालयांत सकाळच्या वेळेत प्रवेशप्रक्रिया सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची रांग लागते. कागदपत्रे तपासून घेणे, शंका व अडचणी विचारण्यासाठी शिक्षकांना भेटावे लागते. संगणक कक्षात अधिक विद्यार्थी असल्याने बराच वेळ ताटकळावे लागते. अंतिम अर्जावर प्राचार्यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. कागदपत्रे आणि दाखल्यांच्या झेरॉक्स काढून घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाऊस आणि उन्हातील गैरसोय सहन करीत विद्यार्थ्यांना केंद्र आणि कनिष्ठ महाविद्यालय अशा अनेक चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची कसरत होताना दिसत आहे.
चुकीच्या केंद्रात आल्यास विद्यार्थ्यांना हेलपाटा पडत आहे. अनेक केंद्रांवर संबंधित शिक्षक किंवा पर्यवेक्षक बैठक तसेच, इतर कामात व्यस्त असल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. संबंधित शिक्षक येईपर्यंत त्यांना नाइलाजास्तव वाट पाहत थांबावे लागत आहे. याबद्दल अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Students hurry for papers