बांधकाम स्थळांवरील धूळ तत्काळ थांबवा अन्यथा कारवाई; वाढत्या प्रदूषणाने पुणे महापालिकेची कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:03 IST2025-11-20T12:02:09+5:302025-11-20T12:03:36+5:30
वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे

बांधकाम स्थळांवरील धूळ तत्काळ थांबवा अन्यथा कारवाई; वाढत्या प्रदूषणाने पुणे महापालिकेची कठोर भूमिका
पुणे : शहराच्या हवेत वाढत चाललेल्या धूलिकणांच्या प्रदूषणाने अखेर महापालिकेला कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. बांधकाम प्रकल्पांमधून पसरणाऱ्या धुळीमुळे पुणेकरांचेआरोग्य धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेने शहरातील बांधकाम स्थळांवर विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू केली असून, नियम मोडणाऱ्या विकासक आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यात सध्या पीएम-१० आणि पीएम-२.५ या सूक्ष्म धूलिकणांची वाढती पातळी पुणेकरांच्या आरोग्यासाठी गंभीर धोक्याची घंटा आहे. व्यापक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांबरोबरच वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर पावलं उचलली आहेत.
बांधकाम प्रकल्पांमध्ये अनेक ग्रीन नेटचा अभाव, पाणी फवारणी होत नसणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर उघड्यावर ठेवणे आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने झाकून न नेणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. परिणामी आसपासच्या परिसरात धुळीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रदूषण वाढणाऱ्या हंगामात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याने पालिकेने सर्व बांधकाम प्रकल्पांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.
महापालिकेने मोठ्या प्रकल्पांसोबतच गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक संकुले आणि वैयक्तिक बांधकामे यांनाही धूळ नियंत्रणाचे पालन करण्याची सक्त ताकीद दिली आहे. लहान कामांमधील बेफिकिरीही एकत्रितपणे प्रदूषण वाढवते, याची आठवण पालिकेने करून दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तपास पथके शहरात सतत फिरून पाहणी करणार आहेत.
धूलिकण नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना शहरातील बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. या अनुषंगाने महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले असून, मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका