स्टील व्यावसायिकाला धमकावले; प्रतिकार केल्यावर मारहाण, ४० लाखांची बॅग हिसकावून पळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:41 IST2025-07-16T16:40:54+5:302025-07-16T16:41:17+5:30
एका कारमधून उतरत त्यांनी व्यावसायिकाला धमकावले मारहाण करत खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली

स्टील व्यावसायिकाला धमकावले; प्रतिकार केल्यावर मारहाण, ४० लाखांची बॅग हिसकावून पळाले
पुणे : धाराशिव येथून व्यवसायाच्या कारणास्तव शहरात आलेल्या व्यावसायिकाच्या मित्राची ४० लाख रुपये असलेली बॅग तीन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अभिजीत विष्णू पवार (३२, रा. रामलिंगनगर, येडशी, जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञातांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पवार हे व्यावसायिक आहेत. त्यांचा स्टील, पत्र्यांचा व्यवसाय आहे. ते मंगळवारी एका कामासाठी ४० लाख रुपये घेऊन आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मंगेश ढोणे हा सोबत होता. बाबजी पेट्रोलपंपासमोरील इमारतीमध्ये त्यांचे काम होते. त्यांनी चारचाकी बाजूला उभी करत, गाडीमधून पैशांची बॅग घेऊन ते खाली उतरले व इमारतीकडे जाऊ लागले. त्याच वेळी एका कारमधून तीन जण तेथे आले. त्यांनी मंगेश ढोणे यांच्या खांद्यावरील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना अभिजीत पवार यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना हाताने मारहाण करून ते तिघे चोरटे पळून गेले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, लवकरच आरोपी पकडले जातील, असा विश्वास झिने यांनी व्यक्त केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन चोरमले करत आहेत.