कोरोना सुरक्षितता उपाययोजनानंतर शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:04+5:302021-02-05T05:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ५ वी ते ८वीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून (दि. २७) सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने ...

Start school after corona safety measures | कोरोना सुरक्षितता उपाययोजनानंतर शाळा सुरू करा

कोरोना सुरक्षितता उपाययोजनानंतर शाळा सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील ५ वी ते ८वीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून (दि. २७) सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. या शाळा कोरोना सुरक्षितता उपाययोजनानंतरच सुरू करण्यात याव्या, अशा सूचना जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शाळेचे निर्जंतुकीकरण तसेच इतर सुरक्षेचा आढावा घेण्यात यावा असेही जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

जिल्ह्यातील यापूर्वी ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या ५ वी ते ८ वीच्या शाळा बुधवारपासून सुरू होणार आहे. मात्र, या शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन पालकांच्या परवानगीने शाळा सुरू केल्या जाव्यात, अशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शाळा सुरू करताना शाळा परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर तसेच सुरक्षित वाहतूक व्यवस्था आहे की नाही याचीही तपासणी शाला व्यवस्थापन समितीला करावी लागणार आहे. एखाद्या शाळेत विलगीकरण कक्ष असल्यास ते इतरत्र हलवावे आणि इमारतीचा ताबा शाळेला देण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक अंतर राखण्याच्या काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत. बैठक व्यवस्थेत योग्य अंतर राखण्यात यावे. तसेच तशी व्यवस्था नसल्यास मोकळ्या जागेत शाळा भरवण्यात यावे. एका बाकावर एक विद्यार्थ्याला बसवण्यात यावे. तसेच शाळेच्या दर्शनी भागात मार्गदर्शक सूचना लावण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

चौकट

विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे, शाळा परिसरात उभे राहताना सहा फुटांचे अंतर ठेवावे, शाळा परिसरात थुंकण्यास बंदी, गर्दी होण्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ पाणी पिण्याचे ठिकाण, स्वच्छतागृह आदी ठिकाणी अंतर राखण्यासाठी वर्तुळ आखण्यात यावे

Web Title: Start school after corona safety measures