पुणे : भरधाव कारच्या धडकेत १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागात रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कारचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी कारचालक जैद नसीर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोंढव्यातील भोलेनाथ चौकातून निघाला होता. त्यावेळी भरधाव कारने निवृत्तीला धडक दिली. अपघातात निवृत्ती गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी कारचालक जैद याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी झालेल्या निवृत्तीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कारचालक जैद याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे तपासणीत उघडकीस आले. जैद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.
खराडी भागात शनिवारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर कोंढवा भागात झालेल्या अपघातात कारच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.