नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० कि. मी. प्रतितास करणार; आठवड्याभरात होणार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:44 IST2025-11-17T11:44:20+5:302025-11-17T11:44:41+5:30
वाहनचालकांविरोधात जागेवरच कारवाई करण्यात येणार असून, पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड-शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनरचालकांची तपासणी करण्यात येणार

नवले पूल परिसरात वेगमर्यादा ३० कि. मी. प्रतितास करणार; आठवड्याभरात होणार अंमलबजावणी
पुणे: पुणे शहरातील नवले पूल अपघात प्रकरणानंतर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा, तसेच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी (दि. १५) दिल्या.
यावेळी स्वामी नारायण मंदिर ते नवले पूलदरम्यान तीव्र उतार असल्याने जड वाहनांसाठी वेगमर्यादा ६० वरून ३० कि. मी. प्रतितास करण्यात आली आहे. येत्या आठड्याभरात या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी वेगमर्यादा ६० वरून ३० कि. मी. प्रतितास करण्याचा निर्णय झाल्यानंतर, एनएचएआयकडून या रस्त्यावर स्ट्रीप्स, रम्बलर्स टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यानंतर एनएचएआयकडून वेगमर्यादेचे बोर्ड लावले जातील. त्यानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून एक नोटिफिकेशन काढण्यात येईल, त्यानंतर गरजेनुसार स्पीड गन्स बसवून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल. याप्रक्रियेसाठी साधारण एक आठवड्याचा कालावधी लागणार असून, २४ नोव्हेंबरपासून या नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू होऊ शकते.
पुणे पोलिस तसेच एनएचएआयकडून शनिवारी झालेल्या बैठकीनंतर तत्काळ नवले पूल परिसरातील प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात जागेवरच कारवाई करण्यात येणार असून, लवकरच पुणे-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड-शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनरचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल आढळल्यास तो जागेवरच उतरवण्यात येणार असल्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे.