विनापरवानगी रात्री लपूनछपून घुसखोरी; बांगलादेशातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या १९ जणांना २ वर्षे जेलची हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:02 IST2026-01-09T19:01:58+5:302026-01-09T19:02:48+5:30
१९ आरोपी बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील गस्तीपथकाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी लपतछपत बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले.

विनापरवानगी रात्री लपूनछपून घुसखोरी; बांगलादेशातून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या १९ जणांना २ वर्षे जेलची हवा
पुणे : बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारतबांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतात घुसखोरी करून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या महिला व पुरुष अशा १९ जणांना न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. पी. कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.
शबिना ऊर्फ साथी ईकलास मुल्ला यांच्यासह इतर १९ (सर्व रा. बांगलादेश) आरोपींना शिक्षा देण्यात आली असून, दंड न भरल्यास १० दिवस सक्तमजुरी व परकीय कायदा कलम १४ (अ )(अ )(ब )अन्वये दोन वर्षे चार महिने पंधरा दिवस सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शिक्षा भोगल्यानंतर सर्वांची बांगलादेशला पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद हजारे यांनी बाजू मांडली.
हे १९ आरोपी बांगलादेशातून कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील गस्तीपथकाची नजर चुकवून रात्रीच्या वेळी लपतछपत बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून पुण्यात अनधिकृतपणे वास्तव्य करताना आढळले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व साबित करणारे कोणतेही दस्तऐवज नसल्याचे समोर आले असून, ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरासखाना पोलिस स्टेशनचे (सध्या छत्रपती संभाजीनगर) पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेशन कोर्टचे कामकाज सहायक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा महानवर, कोर्ट अंमलदार सहायक पोलिस फौजदार ( प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी) संतोष शिंदे यांनी काम पाहिले. वॉरंट समन्स शिरीष कुमार शिंदे सहायक पोलिस फौजदार व नितीन दुधाळ पोलिस हवालदार यांनी बजावले.