CET Exam 2026: परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, इअरफोन, कॅमेरे; थेट उमेदवारी रद्द, सीईटीची कडक नियमावली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:01 IST2026-03-11T10:00:23+5:302026-03-11T10:01:23+5:30
परीक्षेदरम्यान बोलणे, इशारे किंवा संकेत देणे, कॉपी करणे, नोट्स किंवा लिखित साहित्याचा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रश्न-उत्तरे पाठविणे, तोतयागिरी करणे किंवा सामूहिक नक्कल करणे यांसारख्या प्रकारांना गंभीर गैरप्रकार मानण्यात येणार

CET Exam 2026: परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, इअरफोन, कॅमेरे; थेट उमेदवारी रद्द, सीईटीची कडक नियमावली जाहीर
पुणे : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या २०२६ च्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रक्रियेला वेग आला असून, परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच विविध डिजिटल साधनांच्या वापरावर कठोर बंदी घालण्यात आली आहे.
सीईटी नोंदणीची मुदत संपत आली असून, आतापर्यंत सुमारे १२ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी दोन संधी देण्यात आल्याने सुमारे १७ लाख ३९ हजार विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचा अंदाज आहे. परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि अनुचित मार्गांना आळा घालण्यासाठी सीईटी कक्षाने ही सुधारित नियमावली लागू केली आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून एकूण १७ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यापैकी १५ परीक्षा संगणकाधारित पद्धतीने राज्यातील विविध केंद्रांवर घेतल्या जातात. या परीक्षांदरम्यान उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संबंधित संस्थांकडून कोणताही गैरव्यवहार, गैरवर्तन अथवा अनुचित साधनांचा वापर झाल्यास कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. गैरप्रकारांचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षा व दंड निश्चित करणारी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान बोलणे, इशारे किंवा संकेत देणे, कॉपी करणे, नोट्स किंवा लिखित साहित्याचा वापर करणे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रश्न-उत्तरे पाठविणे, तोतयागिरी करणे किंवा सामूहिक नक्कल करणे यांसारख्या प्रकारांना गंभीर गैरप्रकार मानण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित उमेदवाराची चालू शैक्षणिक वर्षातील सीईटीसह इतर परीक्षांसाठीची उमेदवारीही रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन नियमावलीनुसार परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, मोबाइल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन तसेच प्रतिबंधित असलेले कॅल्क्युलेटर यांसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट बाळगणे किंवा वापरणे सक्त मनाई आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित साधने, लपविलेले कॅमेरे, स्क्रीन मिररिंग, रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर किंवा इतर डिजिटल माध्यमांचा वापर आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल. तसेच संबंधितांवर आयटी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.