Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:19 IST2025-10-14T15:18:08+5:302025-10-14T15:19:32+5:30
कुख्यात गुंड निलेश घायवळवर आता या गुन्ह्यासह सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Nilesh Ghaiwal: दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरले; नीलेश घायवळविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरल्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यासह घायवळ याच्यावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोथरूड गोळीबार प्रकरणातील पसार झालेला गुंड नीलेश घायवळ हा युरोपात असल्याची मााहिती मिळाल्यानंतर पुणेपोलिसांनी त्याला ब्लू काॅर्नर नोटीस बजाविली आहे. घायवळला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला आहे. घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणी घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घायवळने बनावट कागदपत्रांद्वारे अहिल्यानगर येथून पारपत्र मिळवले . त्याने ‘ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. घायवळच्या पारपत्राची पोलीस पडताळणी करणाऱ्या अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना त्यांना नोटिशीद्वारे देण्यात आली आहे. घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी नुकतीच घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, निलेश घायवळ हा २०२० पासून दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच टेलीकम्युिनेकशन ॲक्ट २०२३ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.