श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील ३ महिने बंद राहणार; जिल्हाधिकारी लवकरच आदेश काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:54 IST2025-12-23T16:54:29+5:302025-12-23T16:54:46+5:30
कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील ३ महिने बंद राहणार; जिल्हाधिकारी लवकरच आदेश काढणार
भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे क्षेत्र भीमाशंकरमंदिर हे भीमाशंकर येथे होणाऱ्या विकास आराखड्याच्या कामांनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी पुढील ३ महिने बंद करण्याबाततची बैठक आंबेगाव - जुन्नर चे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्थानिक ग्रामस्थांनी ह्याला सहमती दर्शविली. प्रशासकीय अधिकारी हे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे व बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील. यानंतरच जिल्हाधिकारीमंदिर बंद बाबतचा आदेश काढणार आहेत.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त पर्यटक व निसर्गप्रेमी येत असतात. २०२७ मध्ये नाशिक त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा वाराणसी अयोध्या उज्जैन या तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. त्याच प्रमाणे नाशिक येथे २०२७ रोजी होणार्या कुंभमेळा वेळी भीमाशंकर इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे. २०२७ ला होणार्या सिंहस्थ कुंभमेळा गर्दी व्यवस्थापन व इतर सोई सुविधा यासाठी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २८८.१७ कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. ह्या विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी व लवकरात लवकर ही कामे पुर्ण करण्यासाठी प्रशासन, भीमाशंकर देवस्थान व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी तीन महिन्यांसाठी श्री क्षेञ भीमाशंकर मंदीर हे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. ह्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी ह्याला सहमती दर्शविली. प्रशासकीय अधिकारी हे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे व बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील यानंतरच जिल्हाधिकारी मंदिर बंद बाबतचा आदेश काढणार आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंद काळामध्ये कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही. स्थानिक ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, गुरव पुजारी बांधव तसेच प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेते यांनी दर्शनासाठी कोणताही अट्टाहास करू नये असा सूचना देण्यात आल्या. यानंतर प्रशासन देवस्थान ट्रस्ट व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसर पायरी मार्ग बस स्थानक वाहनतळ याची पाहणी करण्यात आली.
या वेळी आंबेगाव जुन्नर चे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी,भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, खेड तहसिलदार प्रशांत बेडसे, सचिन वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डाॅ.विलास वाहणे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे शरद बॅंकेचे संचालक मारुती लोहकरे, भीमाशंकरचे सरपंच दत्ताञय हिले, निगडाळे सरपंच सविता तिटकारे, स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान विश्वस्त, उपस्थित होते.