राहुल गांधींविरोधातील दाव्यात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस; सात्यकी सावरकरांनी केला होता दावा

By नम्रता फडणीस | Published: March 9, 2024 04:22 PM2024-03-09T16:22:33+5:302024-03-09T16:24:46+5:30

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले होते. त्यात त्यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता....

Show-cause notice to police in suit against Rahul Gandhi; The claim was made by Satyaki Savarkar | राहुल गांधींविरोधातील दाव्यात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस; सात्यकी सावरकरांनी केला होता दावा

राहुल गांधींविरोधातील दाव्यात पोलिसांना कारणे दाखवा नोटीस; सात्यकी सावरकरांनी केला होता दावा

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल तपास करून पोलिसांना २३ फेब्रुवारीपूर्वी तपासणी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. मात्र, तपासणी अहवाल दिनांक ५ मार्चपर्यंत सादर न केल्यामुळे न्यायालयाने संबंधित पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर भाषण केले होते. त्यात त्यांनी डोकलाम आणि सावरकरांचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते की, सावरकर आणि त्यांचे पाच-सहा मित्र एका मुस्लिम व्यक्तीला मारत होते. तेव्हा सावरकरांना आनंद होत होता, असे त्यांनी पुस्तकात लिहिले आहे. तसेच डोकलामचा उल्लेख करीत समोरची पार्टी कमजोर असेल तर तिला मारावे आणि जर आपण कमजोर असू तर पळून जावे, असे विधान गांधी यांनी केले होते. या वादग्रस्त विधानाप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.

सात्यकी सावरकर यांनी संबंधित सर्व पुरावे व साक्षीदार न्यायालयात सादर केले होते. संबंधित पुरावे व साक्ष गृहीत धरून दि. १९ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात प्राथमिक सत्यता निदर्शनास आल्यामुळे व आरोपी न्यायालयाच्या कक्षेबाहेर वास्तव्यास असल्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने संबंधित पोलिस स्टेशनला फौजदारी प्रक्रिया संहिता २०२ अन्वये सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार आरोपी न्यायालयीन स्थळ सीमेबाहेर वास्तव्यास असल्यामुळे विश्रामबाग पोलिसांना तपासणी अहवाल २३ फेब्रुवारी अथवा तत्पूर्वी सादर करण्याबाबत आदेश दिले होते. पण, हा अहवाल दिनांक ५ मार्चपर्यंत सादर न केल्यामुळे न्यायालयाने संबंधित पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिल रोजी होणार आहे.

Web Title: Show-cause notice to police in suit against Rahul Gandhi; The claim was made by Satyaki Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.