पुणे : किरकोळ वादातून सराईतांकडूून मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवार पेठेत रविवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी सराईतांना फरासखाना पोलिसांनीअटक केली. रोहित माने (३०, लोहियानगर) आणि कासीम असीफ अन्सारी (२३ रा. लोहियानगर) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत किरण केदारी (३७, रा. गोखलेनगर) याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास केदारी हा मित्र शाम गायकवाड, अश्फाक शेख आणि संतोष कांबळे यांच्याबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी माने आणि अन्सारी तेथून दुचाकीवरून चकरा मारत होते. केदारी आणि त्याच्या मित्रांनी दुचाकीस्वार मानेला जाब विचारला. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अन्सारी याने कंबरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. केदारी यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर अन्सारीने दहशत माजवण्यासाठी पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर केदारी आणि त्याचे मित्र घाबरले. आरोपींनी तोपर्यंत तेथून पळ काढला. काही वेळानंतर रोहित माने तेथे पुन्हा आला. आपल्याला प्रकरण मिटवायचे आहे?, असे सांगितले. चौघांनी माने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या अन्सारीला पकडले. दोघेही आरोपी सराईत असून, त्यांनी पिस्तूल का बाळगले?, तसेच कोणाकडून आणले?, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करत आहेत.