पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या किरकिटवाडी, नांदोशी, खडकवासला, सणसवाडी, नांदेड, धायरी, कोल्हेवाडी, समर्थ मंदिर, बारंगणे मळा आदी गावांसाठी पाण्याचा केवळ निर्जंतुकीकरण करून पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा व ‘झू प्लान्कटन’(सायक्लोप्स) सारखे घटक नियंत्रित करणे शक्य होत नाही. त्यामुळे तेथे शक्य तितक्या लवकर जलकेंद्रातून शुद्ध केलेले पाणी पुरवणे आवश्यक आहे, असे महापालिकेच्या अहवालात नमूद केले आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी प्रदूषण होत आहे. सांडपाणी वाहून येत आहे. त्यामुळे या पाण्यात ‘ई कोलाय’ सारखे घातक जिवाणू आढळत आहेत.
पाच ते १८ जानेवारी या कालावधीत किरकिटवाडी, नांदोशी, खडकवासला, सणसवाडी, नांदेड, धायरेश्वर, धायरी, कोल्हेवाडी, समर्थ मंदिर, बारंगणे मळा या भागांतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात बहुतांश ठिकाणी ‘कॉलिफॉर्म’ व ‘ई कोलाय बॅक्टेरिया’ नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पुण्याला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी प्रदूषण होत आहे. सांडपाणी वाहून येत आहे. त्यामुळे या पाण्यात ‘ई कोलाय’ सारखे घातक जिवाणू आढळत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, क्लोरिनची पुरेशी मात्रा दिल्यानंतर हा ‘ई कोलाय’ नष्ट होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बहुतांश ठिकाणी क्लोरिनची मात्रा पुरेशी
२२ जानेवारी रोजी महापालिका हद्दीतील ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) बाधित रुग्णांच्या परिसरातील पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केली गेली. या चाचणीत काही भागातील मोजक्या तक्रारी वगळता बहुतांश ठिकाणी क्लोरिनची मात्रा पुरेशी (रेसिड्युअल क्लोरिन टेस्ट) आढळली, असे महापालिकेच्या पर्वती जलकेंद्राच्या रसायनशास्त्रज्ञांच्या अहवालात म्हटले आहे.