Sharad Pawar: पुतण्याच्या विरहावर मात करत शरद पवार पुन्हा मैदानात; नीरा नदीच्या प्रदूषणाची केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:06 IST2026-01-31T10:03:48+5:302026-01-31T10:06:27+5:30
शुक्रवारी पुतण्याच्या अस्थींचे पूजन करताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत त्यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी केली

Sharad Pawar: पुतण्याच्या विरहावर मात करत शरद पवार पुन्हा मैदानात; नीरा नदीच्या प्रदूषणाची केली पाहणी
बारामती : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखातूनही बारामती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी (दि. ३०) सकाळी पुतण्याच्या अस्थींचे पूजन करताना ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत त्यांनी दुपारीच नीरा नदीच्या प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नीरावागज गावात भेट दिली.
नीरावागज येथे पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी स्थानिक शेतकरी, नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बारामती व फलटण तालुक्यांतील खासगी दूध संस्था तसेच साखर कारखान्यांकडून सोडल्या जाणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे नीरा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याच्या तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. या समस्येची दखल घेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांशी थेट चर्चा करून नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन उपस्थितांना दिले. ‘वारंवार पाहण्या होतात, मात्र ठोस कारवाई होत नाही,’ अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकांनी अनेक वेळा पाहणी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नीरा नदीच्या प्रदूषणाबाबतही अजित पवार यांनी हयात असताना गांभीर्याने लक्ष घातले होते. त्यांच्या सूचनेनुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सांडपाणी प्रक्रिया युनिट कार्यान्वित करण्यात आले असून, सांडपाणी शून्य टक्के प्रदूषणविरहित राहणार असल्याची माहिती यावेळी कारखान्याच्या संचालकांनी शरद पवार यांना दिली.
पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत
सन १९८८ मध्ये शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे बारामतीची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर अजित पवार यांनी बारामतीचा विकासाचा वेग वाढवला. मात्र आता अजित पवार नाहीत तसेच शेतकऱ्यांविषयी प्रचंड जिव्हाळ्यामुळे शरद पवार यांनी वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून नीरावागज येथे भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. नीरा नदीच्या प्रश्नात लक्ष घालून त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात उतरण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.