Madhav Gadgil: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 08:54 IST2026-01-08T08:52:28+5:302026-01-08T08:54:14+5:30
Madhav Gadgil Death: आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत...

Madhav Gadgil: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा असे अभ्यासपूर्णपणे सांगणारी व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे अल्पशा अजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटलमध्ये बुधवारी (७ जानेवारी) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत
आज त्यांचे पार्थिव 'पंचवटीतील पाषाण येथील ए-१८, स्प्रिंग फ्लॉवर अपार्टमेंट' या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण आणि परिसंस्था संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करणारी एक व्यक्ती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ -
आयुष्यभर पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या सर्वोच्च पुरस्काराने गेल्यावर्षीच अर्थात २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये दिला जातो. याशिवाय डॉ. गाडगीळ यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन -
त्यांचा पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. त्या संशोधनावर एक पुस्तक देखील प्रसिध्द झाले आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला होता. डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहेत.