गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:23 IST2026-01-20T19:22:44+5:302026-01-20T19:23:00+5:30
गुंतवणुकीचे आमिष दाखवून अथवा कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी रुपयांची, तर काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाईची भीती दाखवून महिलेची ४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक सायबर चोरट्यांनी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक हे मगरपट्टा सिटी परिसरात राहायला असून, त्यांचा हडपसरमधील ओैद्योगिक वसाहतीत छोटा कारखाना होता. कोरोना काळात कारखान्याच्या विक्रीतून त्यांना मोठी रक्कम मिळाली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्याच्या खात्यात त्यांनी सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली. रक्कम जमा केल्यानंतर चोरट्यांनी परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा दिला नाही. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी २२ कोटी ३ लाख २२ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार कोंढवा भागात राहाणाऱ्या महिलेच्या बाबतीत घडला. काळ्या पैशांच्या व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची चार लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर डिसेंबर महिन्यात संपर्क साधला होता. काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगितल्याने महिला घाबरली आणि तिने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.