पुणे: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांच्यावर बुधवारी (दि. २१) दुपारी वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पांजली अर्पण केली. या प्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, काॅंग्रेस पदाधिकारी अभय छाजेड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जाेशी, सुनिताराजे पवार, सतिश देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुका येथील भास्कर फोयरमध्ये डाॅ. जयंत नारळीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेे हाेते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी, प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, अरविंद गुप्ता यांच्यासह विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी माेठ्या संख्येने उपस्थिती लावून अंत्यदर्शन घेतले.
बाल विज्ञान केंद्राला बळ मिळणे हीच खरी श्रद्धांजली
विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तळागाळात झाला पाहिजे, यासाठी डाॅ. जयंत नारळीकर कायम प्रयत्नशील होते. त्यामुळेच संपूर्ण जग इंग्रजी लेखनाच्या मागे लागलेले असताना डाॅ. नारळीकर मात्र आवर्जून आपल्या मात्रभाषेत अर्थात मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानाची गाेडी लागावी म्हणून बाल अन्वेषण विज्ञान केंद्र सुरू केले हाेते. दर दुसऱ्या शनिवारी पुण्यातील १०० हून अधिक शाळांमधील सुमारे १००० विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आयुका येथे लोकप्रिय विज्ञान व्याख्यान/प्रदर्शन हाेत असे. हे त्यांचे महत्वाकांक्षी कार्य अधिक जाेमाने पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करने, हीच खरी श्रद्धांजली ठरू शकते. असे काहींनी खासगीत बाेलनाता सांगितले. तसेच यासाठी सर्वच पातळीवर पुढाकार घेतला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली.
विद्यापीठातील अभ्यास केंद्राला नारळीकर यांचे नाव मिळणार?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुका यांच्या वतीने एक अभ्यास केंद्र चालवले जात आहे. ज्यामुळे संशाेधनाला अधिक चालना मिळत आहे. आगामी काळात या अभ्यास केंद्राला खगाेलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर यांचे नाव देण्याचा विचार केला जाऊ शकताे, अशी माहिती खासगीत बाेलताना मिळाली.
आयुका करणार श्रद्धांजली सभेचे आयाेजन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगाेलशास्त्रज्ञ, आयुकाचे संस्थापक डाॅ. जयंत नारळीकर यांना मानणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लाेक जगभर आहेत. त्यातील अनेकांना अंतविधीला येता आले नाही. त्यामुळे आयुकासह विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांकडून अभिवादन करण्यासाठी लवकरच आयुका येथे श्रद्धांजली सभा आयाेजित केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.