माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:21 PM2024-04-03T12:21:09+5:302024-04-03T12:21:31+5:30

मी मुरलीधर मोहोळ, रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका न करता त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात भूमिका मांडत राहणार

Seeing my work Punekars will stand by me and make me victorious Faith of spring peacocks | माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास

माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील; वसंत मोरेंचा विश्वास

पुणे: राज्यातील लोकसभेत चर्चेचा विषय ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघातही प्रवेश केला आहे. पुणे लोकसभेतून त्यांनी वसंत मोरे, शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली तर मावळ आणि बारामतीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केलेला नाही. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन जवळपास २० दिवसांचा कालावधी होऊन गेला होता. दरम्यान वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधताना माझं काम पाहून पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे लोकसभेसाठी जाहीर केलेले वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडखोर आहेत. लोकसभा निवडणूक लढवू नये, असा अहवाल मनसेच्या स्थानिक नेत्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला असा आरोप करत त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. निवडणूक लढवणारच असे जाहीर करत त्यांनी मागील काही दिवसात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी 'वंचित'चे प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली, त्याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांच्याकडेही ते गेले होते. मोरे माजी नगरसेवक, मनसेचे माजी शहराध्यक्ष आहेत. समाज माध्यमांवर ते प्रसिद्ध आहेत. पुणे लोकसभेत आता महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर, महायुतीचे मुरलीधर मोहोळ व वंचित चे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होईल. मोरे कोणासाठी धोकादायक ठरतील की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, असे औत्सुक्य आता राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे.  

वसंत मोरे म्हणाले, मी उमेदवारीसाठी महाविकास आघाडी नेत्यांना भेटलो. पण तिकडं काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली होती. त्यांच्याशी दीड तास सविस्तर चर्चाही झाली होती. अखेर मला प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल आणि मी किमान ५५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल. त्याचबरोबर आजवरचं माझं काम पाहून पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी उभे राहून मला विजयी करतील असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. 

त्यांच्या पक्षाच्या चुकीच्या कारभाराविरोधात सातत्याने भूमिका मांडणार 

मुरलीधर मोहोळ आणि रविंद्र धंगेकर या दोघांसोबत मी पुणे महापालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे. ते दोघे पण माझे चांगले मित्र आहेत. तसेच मी या निवडणुकीत वैयक्तिक टीका करणार नाही. तर त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात सातत्याने भूमिका मांडत राहणार असल्याचे वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले. 

यासंदर्भात 'लोकमत'बरोबर बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'बारामतीमध्ये आम्ही उमेदवार दिला नाही, याचा अर्थ सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला की अन्य कोणाला, याचा अर्थ तुम्ही लावू शकता. पुणे जिल्ह्यात आम्ही दिलेले दोन्ही उमेदवार चांगली कामगिरी करतील. पुण्यात 'वंचित'ची ताकद असून ती आता एकवटून काम करेल.'

Web Title: Seeing my work Punekars will stand by me and make me victorious Faith of spring peacocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.