शाळकरी मुलीवर प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:20 IST2025-09-25T17:20:20+5:302025-09-25T17:20:29+5:30
आरोपीने मुलीला घरी बोलावून दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी देत अत्याचार केले

शाळकरी मुलीवर प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
पुणे : शाळकरी मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करत तिला लग्नाची मागणी घालून प्रेमसंबंधाबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि २८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश (पॉक्सो) कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली.
अजय प्रकाश तापसे (वय २२, रा. स्वयंभू बिल्डिंग, मांजरी खुर्द. मूळ रा. शिरोळे, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना डिसेंबर २०२१ मध्ये मांजरी खुर्द परिसरात घडली. पीडिता ही शाळेत नववी इयत्तेत शिकते. घटनेच्या एक वर्षापूर्वी आरोपी आणि तिची ओळख झाली. या दरम्यान, त्यामध्ये प्रेमसंबंध झाले. त्यानंतर आरोपीने दिलेला विवाहाचा प्रस्ताव तिने मान्य केला. त्यानंतर, त्याने तिला घरी बोलाविले. दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडिता ही अवघी १३ वर्षांची आहे. आरोपीने गंभीर गुन्हा केला असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे समाजात चांगला संदेश जाईल, असा युक्तिवाद ॲड. कोंघे यांनी केला. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत शिक्षा सुनावली. तसेच, पीडितेला कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले.