पुणे : बाणेर येथील ननावरे पूल ते राधा चौक दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर भरधाव जाणाऱ्या स्कूल बसने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडक दिली. त्यात ही ट्रॉली उडून मागील बाजूने येणाऱ्या मोटारसायकलवर पडली. त्यात डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.
शिवाजी उत्तमराव शिंदे (वय ५३, रा. पांडुरंग शिंदे चाळ, सायकर मळा, बाणेर) असे मृत्यू पावलेल्या डिलिव्हरी करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गजानन शिवाजी शिंदे (वय २६, रा. सायकर मळा, बाणेर) यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ध्रुव इंटरनॅशनल स्कूल बसचा चालक विकास भगवानराव गोंगे (वय ३५, रा. बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात स्कूल बस चालक विकास गोंगे हाही जखमी झाला आहे. हा अपघात ननावरे पूल ते राधा चौकदरम्यान मर्लिन व्हेंटाना साईटजवळील सर्व्हिस रोडवर ११ मार्च रोजी दुपारी पावणे पाचच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे हे आपल्या दुचाकीवर डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. विकास गोंगे हा ध्रुव इंटरनॅशनल स्कूलची बस घेऊन शाळेतील मुलांना सोडून पुन्हा परत जात होता. सर्व्हिस रोडवर भरधाव जाताना त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणारा ट्रॅक्टर त्याला दिसला. त्याने ट्रॅक्टरला होणारी धडक टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस वेगात असल्याने ट्रॅक्टर पुढे गेला तरी त्याच्या ट्रॉलीला बसची जोरात धडक बसली. या ट्रॅक्टरच्या मागे दुचाकीवर शिवाजी शिंदे चालले होते. बसची धडक बसल्याने ट्रॉली वेगाने फिरली आणि उंच उडून ती मागे असलेल्या दुचाकीवर पडली. अंगावर ट्रॉली पडल्याने त्यात गंभीर जखमी होऊन शिवाजी शिंदे यांचा मृत्यू झाला. बसचालक विकास गोंगे हाही जखमी झाला असून बाणेर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत.
Web Summary : A school bus, while overtaking, collided with a tractor trolley in Baner, Pune. The trolley fell on a motorcycle, killing a delivery boy, Shivaji Shinde. The bus driver is booked and injured.
Web Summary : पुणे के बानेर में ओवरटेक करते समय एक स्कूल बस ने ट्रैक्टर ट्रॉली को टक्कर मार दी। ट्रॉली एक मोटरसाइकिल पर गिर गई, जिससे डिलीवरी बॉय शिवाजी शिंदे की मौत हो गई। बस ड्राइवर पर मामला दर्ज।