तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांमध्ये राडा; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंग, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:36 IST2025-07-15T20:36:07+5:302025-07-15T20:36:30+5:30

पोलीस तक्रार घेत नाही असा आरोप करत भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी व तरूणींनी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालय गाठून तेथे ठिय्या मांडला

Ruckus between wrestler and future police officer on Taljai; Molestation of girls preparing for police recruitment, what is the real issue? | तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांमध्ये राडा; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंग, नेमकं प्रकरण काय?

तळजाईवर पैलवान व भावी पोलिसांमध्ये राडा; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींचा विनयभंग, नेमकं प्रकरण काय?

पुणे: पैलवान आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांमध्ये मंगळवारी सकाळी तळजाई मैदानांवर चांगलाच राडा झाला. यावेळी पैलवानांनी भावी पोलिसांना शिविगाळ करून मारहाण केल्याची व तरुणींचाही विनयभंग केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान, यासंदर्भात सहकार नगर पोलिस तक्रार घेत नसल्याचा आरोप करत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसह तरुणींनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

सहकारनगरमधील तळजाई मैदानावर दररोज सकाळी १५० ते १७० तरूण व तरुणी पोलीस भरतीची तयारी करतात. भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांच्या सांगण्यानुसार, ते मंगळवारी (दि. १५) सकाळी तळजाई मैदानावर सराव करत होते. त्यावेळी मैदानाच्या मध्यभागी चार पैलवान थांबले. त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यानंतर शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. यावेळी पोलिस खात्यातंर्गत पीएसआय पदासाठी मैदानी परिक्षेचा सराव करण्यासाठी आलेले एक पोलीस अमलदार भांडण सोडवण्यासाठी आले. मात्र, पैलवानांनी त्यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर पैलवानांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून सराव करणाऱ्या तरूणांना मारहाण केली. यावेळी काही पैलवानांनी तरूणींचा विनयभंग करीत छेडछाड केल्याचा आरोप भरतीचा सराव करणाऱ्या तरूणांनी केला.

दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास मारहाण होऊनही सहकार नगर पोलिस पैलवानांच्या विरोधात तक्रार घेत नाहीत, असा आरोप करत भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी व तरूणींनी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालय गाठून तेथे ठिय्या मांडला. यावेळी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणांशी चर्चा करून सहकार नगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Ruckus between wrestler and future police officer on Taljai; Molestation of girls preparing for police recruitment, what is the real issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.