Rohit Pawar: महाराष्ट्रात राजकारण विकासाचं होणार; भगव्या ध्वजाचं होऊ देणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 17:47 IST2021-10-15T17:46:53+5:302021-10-15T17:47:25+5:30
आमदार रोहित पवार (rohit pawar) यांच्या संकल्पनेतून कर्जत - जामखेड येथे भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे

Rohit Pawar: महाराष्ट्रात राजकारण विकासाचं होणार; भगव्या ध्वजाचं होऊ देणार नाही
पुणे : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत - जामखेड येथे भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रोहित पवार यांच्या हस्ते स्वराज्य ध्वज सोहळा पार पडला. यावेळी रोहित पवार यांनी महाराष्ट्र राज्यात विकासाचं राजकारण होईल. पण भगव्या रंगाचं राजकारण होऊ देणार नाही असा विश्वास या सोहळ्यात व्यक्त केला आहे.
समानतेचा विजय असो, एकतेचा विजय असो, ध्वज ठराविक लोकांचा नाही तर तो सर्वांचं आहे. ध्वजाची खरी ताकद एकतेची आहे. असा संदेश देत त्यांनी मनोगताला सुरुवात केली.
पवार म्हणाले, ''मला ध्वजामुळे पब्लिसिटी करायची नाही. लोक म्हणतात तुम्ही नेहमी विकासाबाबत बोलत होता मग आज हे नवीन काय आहे. त्यांना मी सांगू इच्छितो कि, मी विकासाचं राजकारण करणार पण या ध्वजाचे आणि रंगाचं राजकारण महाराष्ट्रात होऊ देणार नाही. अशा रंगाचे राजकारण खेळल्याने भगव्या ध्वजाच्या विचारांची ताकद होते.
''महाराष्ट्रात धार्मिक स्थळे, गावे, शहरे सर्व ठिकणांबरोबरच सर्वसामान्यांच्या मनामनात हा ध्वज गेला पाहिजे. कुटुंबातील माता, भगिनी, युवा पिढी सगळ्यांना ध्वजाचे महत्व कळायला हवे. आपण नवीन गाडी, घर घेतल्यावर नवीन हॉस्पिटल बांधल्यावर त्यांचं पूजन करतो. त्याप्रमाणेच या ध्वजाचे पूजन केले आहे.''
''जातिभेदांमुळे आंदोलने होऊन डोकी मात्र सामान्य घरातल्या युवकांची फुटतात. आपली धार्मिक स्थळे, धर्मग्रंथ, थोर व्यक्ती सगळ्यांनी एकच विचार दिला. कि सर्वानी एकत्र या.. हेच या ध्वजाचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी ध्वजाच्या विचारांना आत्मसात करून अन् जातिभेदाला विसरून एकत्र यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.''
तब्बल ७४ मीटर उंचीचा ध्वज
भारतातील सर्वात उंच अशा या भगव्या ध्वजाची उंची ७४ मीटर आहे. तर स्तंभाचे वजन १८ टन इतके आहे.