अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:54 IST2026-04-28T11:48:01+5:302026-04-28T11:54:05+5:30
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांचे खळबळजनक आरोप; 'त्या' कंपनीला ९ कोटी

अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
Rohit Pawar on VSR: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात त्यांनी काही महत्त्वाचे पुरावे सादर केल्याचे समजते. मात्र, या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
'त्या' मालकाला सरकार वाचवतंय?
रोहित पवार यांनी दावा केला आहे की, ज्या कंपनीच्या विमानाला अपघात झाला, त्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
९ कोटी रुपयांचा 'व्यवहार' चर्चेत
यावेळी रोहित पवार यांनी एका मोठ्या आर्थिक व्यवहारावर बोट ठेवले. "अनेक शेतकरी कंत्राटदार हे त्यांच्या पैशांसाठी आंदोलन करत आहेत. पण व्हीएसआरला जानेवारी महिन्यापासून म्हणजेच अजित पवारांचा अपघात झालेल्या २८ तारखेपासून आतापर्यंत १४५ कोटी रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये देण्यात आले आहेत. २७ जानेवारी रोजी पंधरा कोटी दिले आहेत. अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी या वि. के. सिंगला कदाचित बक्षीस म्हणून नऊ कोटी ८१ लाख देण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी रुपये दिले," असं रोहित पवार म्हणाले.
"काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका लग्न सोहळ्यामध्ये हाच व्ही.के. सिंग राज्यातील एका बड्या नेत्याला काही कागदपत्रे देत होता आणि त्याच कंपनीच्या विमानाने हा मोठा नेता परत मुंबईला आला. आम्ही अजित दादांना न्याय मिळावा यासाठी बोंबलत आहोत आणि तुम्ही दुसरीकडे व्ही.के. सिंगला आणि त्यांच्या कंपनीला घाबरू नका असं संदेश देतात," असाही आरोप रोहित पवार यांनी केला.
अमोल मिटकरींना विधान परिषद द्यायला काय हरकत आहे- रोहित पवार
"आमचा नेता गेलाय त्यामुळे आम्ही भावनिक झालेलो आहोत आणि आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही फक्त भाषण करण्यासाठी हे बोलत नाही. यामध्ये अराजकीय भूमिका घेत आमच्या नेत्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बाजूने बोलतात त्यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यायला काय हरकत आहे. पण काही नेते मुलाचं, पुतण्याचं नाव पुढे करत आहेत. त्यामुळे आता जो दादांसाठी भूमिका घेतो किंवा जो पैशांची भूमिका घेतो यापैकी कोणाला न्याय मिळेल हे बघावे लागेल," असंही रोहित पवार म्हणाले.