रोहित आर्याचे पुणे कनेक्शन; स्वतःचे आडनाव बदलले, वडिलांचे घर कोथरूडमध्ये, काय सांगतात शेजारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:55 IST2025-10-31T15:54:39+5:302025-10-31T15:55:24+5:30
रोहितचे वडील ए. आर.हारोळीकर त्यांच्या पत्नीसह कोथरूमध्ये राहत असून रोहितने पूर्वी कधीतरी त्याचे आडनाव बदलले असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले आहे

रोहित आर्याचे पुणे कनेक्शन; स्वतःचे आडनाव बदलले, वडिलांचे घर कोथरूडमध्ये, काय सांगतात शेजारी?
पुणे : 'अ थर्सडे' या चित्रपटाप्रमाणे अपहरणाचा थरार मुंबईत गुरुवारी घडला. ऑडिशनच्या नावाखाली परभणी, लातूरसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या १५ वर्षाखालील १७ मुलांसह २० जणांना रोहित आर्या (वय ५०) नावाच्या व्यक्तीने पवईच्या प्रसिद्ध आर. ए. स्टुडिओमध्ये ओलिस ठेवल्याच्या घटनेने गुरुवारी खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी बोलण्यात गुंतवून त्याचे एन्काउंटर केले आणि सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली.
आता रोहित आर्याचे पुणे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित आर्याचे वडील कोथरूड मधील शिवतीर्थ नगरच्या स्वरांजली सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या घराला कुलूप असून येथे आता कोणीही राहत नसल्याचे कोथरूड पोलिसांनी सांगितले. कालच्या घटनेनंतर त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याच्याबाबत अजून अधिकृत काही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या स्वरांजली भागातील रहिवासी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रोहितचे वडील ए. आर.हारोळीकर त्यांच्या पत्नीसह आमच्या सोसायटीत राहत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रोहितने पूर्वी कधीतरी त्याचे आडनाव बदलले असल्याचे आम्ही ऐकले आहे. हारोळीकर हे हृदयविकाराचे रुग्ण आहेत. हे जोडपे काल दुपारी मुंबईला रवाना झाले. रोहित त्याची पत्नी आणि मुलासोबत जवळच्याच एका सोसायटीत राहतो, असे आम्ही ऐकले आहे." दुसऱ्या एका शेजाऱ्याने सांगितले की, "ते वृद्ध जोडपे नेहमी कोणाशी फारसे बोलत नव्हते. रोहितशी माझे दोनदा बोलणे झाले आहे. कोविड महामारीच्या काळात तो नियमितपणे आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी येथे येत होता. मला तो हुशार आणि उत्साही माणूस वाटला होता. जे घडले ते खूप दुःखद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
कोण होता रोहित? काय होत्या मागण्या?
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या 'पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा'ची २ कोटींहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप रोहित आर्या याने केला होता. या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत, जाणीवपूर्वक त्याच शाळांची विजेते म्हणून निवड केली, असा गौप्यस्फोटही त्याने केला होता. त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकदा उपोषणेही केली होती. सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेबाबत सखोल तपास सुरू आहे. आरोपीकडे एअर गन आणि विशिष्ट प्रकारचे रसायन देखील आढळले आहे.