फूड डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी; १४ घरफोड्या, ८० लाखांचे सोने, अखेर आरोपी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:07 IST2025-01-16T14:06:58+5:302025-01-16T14:07:49+5:30
पोलिसांनी तब्बल ८० लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, हत्यारे व चोरीचे साहित्य जप्त केले असून त्या व्यक्तीकडून सोने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अटक

फूड डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी; १४ घरफोड्या, ८० लाखांचे सोने, अखेर आरोपी जाळ्यात
सहकारनगर : झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून सुमारे चौदा पेक्षा अधिक घरफोडी आणि एसटीबस स्थानकावर आठपेक्षा अधिक चोऱ्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल ८० लाख रुपयांचे सोने, चांदी, हिरे, हत्यारे व चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय सोन्याचे दागिने ज्यांना विकले त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीकडून सोने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली.
मुख्य आरोपी गणेश काठेवाडे, सोने विकत घेणारे सुरेश पवार आणि सराफ व्यावसायिक भिमसिंग राजपूत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी चोराचा छडा लावण्यासाठी कसून तपास सुरू केला होता. त्याचाच भाग म्हणून त्यांनी या परिसरातील १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार आणि पोलिसांच्या गुप्त बातमीदारांच्या वर्णनावरून पोलिसांनी गणेश कोठावळे याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने पुणे शहरात तब्बल १४ पेक्षा अधिक घरफोडी केल्याची आणि स्वारगेट परिसरात ९ चोऱ्या केल्याची कबुली दिली. घरफोडी करताना तो फूड डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून सोसायटी परिसरात रेकी करत होता व परिसराची पूर्ण माहिती घेतल्यानंतर तो चोरी करत असल्याची माहिती गणेश याने पोलिसांना दिली. घरफोडीमध्ये चोरी केलेले दागिने त्याने सुरेश पवार याला विकले होते. सुरेश पवार याने ते दागिने सराफ व्यावसायिक भीमसिंग राजपूत याला विकले.
ही कारवाई पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पश्चिम विभागाचे प्रवीणकुमार पाटील, पोलिस उप-आयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलिस निरीक्षक, राहुल कोलंबिकर, पोलीस उप-निरीक्षक रवींद्र कस्पटे, तसेच पोलिस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतीश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, विक्रम सावंत, शरद गोरे, रमेश चव्हाण, उज्वला थोरात, पोर्णिमा गायकवाड, सुनीता खामगळ, सुरेखा कांबळे, पोलिस मित्र दिनेश परिहार यांनी केलेली आहे.