वाहतूक पोलिसांना कारवाईस विरोध
By Admin | Updated: September 22, 2014 05:44 IST2014-09-22T05:44:09+5:302014-09-22T05:44:09+5:30
पार्किंग’च्या बाहेर रस्त्यातच उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना शगुन चौकातील काही व्यापारयांनी विरोध केला

वाहतूक पोलिसांना कारवाईस विरोध
पिंपरी : ‘पार्किंग’च्या बाहेर रस्त्यातच उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना शगुन चौकातील काही व्यापारयांनी विरोध केला. कारवाई केल्यास रस्त्यावर उतरु अशी दमबाजीची
भाषा केल्याने पोलीस व व्यापारी यांच्यात वाद झाला. याप्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रविवारी रात्री आठच्या सुमारास पिंपरी कॅम्पातील रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करुन उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून नेहमीप्रमाणे कारवाई केली जात होती. दरम्यान, शगुन चौकातील रस्त्यावरील पार्किंगच्याबाहेर उभ्या केलेल्या एका दुचाकीला जॅमर लावण्यात आला. आपल्या दुकानासमोरील वाहनांवर कारवाई करत असल्याचे पाहून व्यापारी बाहेर आले. कारवाई करण्यास पोलिसांना विरोध केला. तरीही पोलिसांनी कारवाई सुरुच ठेवली. त्यानंतर काही व्यापारी एकत्र आले. कारवाई केल्यास रस्त्यावर उतरु अशी दमबाजीची भाषा सुरु
केली. यामुळे पोलीस व व्यापारयांमध्ये वाद सुरु झाला. गर्दी वाढल्याने
शगुन चौक परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येथील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गणपती विसर्जनादिवशी एकेरी वाहतुकीमुळे रस्ता बंद असतानाही त्या रस्त्याने वाहन सोडण्याचा आग्रह
एका माजी उपमहापौराने धरला. पोलिसांनी वाहन सोडण्यास नकार दिल्याने माजी उपमहापौर व त्यांचे समर्थकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)