पुणे : घाट परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पात एकूण २८.६६ टीएमसी साठा जमा झाला आहे. तर धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुमारे ३९ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे चेरापुंजी ठरलेल्या मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात बुधवारी संपलेल्या २४ तासांत तब्बल ५७५ मिलिमीटर पावसाची उच्चांकी नोंद करण्यात आली. हा पाऊस आजवरचा सर्वाधिक पाऊस असल्याचे बोलले जात आहे. ‘ताम्हिणी’त यंदाच्या मोसमात आतापर्यंत ७ हजार ४२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापांसून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरला. मात्र, धरण परिसरात पाऊस कायम होता. जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून मंगळवारी रात्री सात वाजल्यापासून ३४ हजार ३०१ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग करण्यात येत होता. रात्री पावसाचा जोर वाढल्याने हा विसर्ग बुधवारी सकाळी १० वाजता ३९,१३८ क्युसेक करण्यात आला. मात्र, सकाळी ११ नंतर पावसाचा जोर कमी झाला. सायंकाळी ५ वाजता संपलेल्या ११ तासांमध्ये खडकवासला परिसरात १३, पानशेतमध्ये ४२, वरसगावमध्ये ५०, तर टेमघर धरण परिसरात ६४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर चारही धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा २८.६६ टीएमसी झाला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू होता.
दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ४० महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यात हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या मावळ तालुक्यात आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत ११४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या हे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील मुठा खोऱ्यात ९८.३७, नीरा खोऱ्यात ९७.९९, कुकडी खोऱ्यात ७७.१९, तर भीमा उपखोऱ्यात ९५.४१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या पावसामुळे मुळशी तालुक्यातील पडळघर येथील ९ कुटुंब व रामनगर येथील २ कुटुंबांना लवासा सिटीत स्थलांतरित करण्यात आले आहे. तर आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील स्मशानभूमीत अडकलेल्या ५ जणांची बोटीतून सुटका करण्यात आली.
‘ताम्हिणी’त पावसाचा विक्रम
गेल्या काही वर्षांपासून ताम्हिणी घाटात मोठा पाऊस पडत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी २५ जुलै रोजी ‘ताम्हिणी’त एका दिवसात ५६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तर २० ऑगस्ट रोजी तब्बल ५७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा आजवरचा विक्रम असण्याची शक्यता आहे. ‘ताम्हिणी’त यंदाच्या मोसमात आतापर्यंत ७ हजार ४२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हादेखील आजवरचा विक्रम आहे.
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा
धरणांतील पाणीसाठा (टीएमसी) टक्के
खडकवासला १.९६- ९९.१६पानशेत १०.३८- ९७.५०वरसगाव १२.६१- ९८.३८टेमघर ३.७१- १००एकूण २८.६६- ९८.३२