धंगेकर ब्लॅकमेलर, प्रसिद्धीसाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न; पाटलांच्या आरोपांवरून भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:43 IST2025-10-09T16:42:50+5:302025-10-09T16:43:39+5:30
धंगेकर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना समजेल अशा भाषेत आम्हीही उत्तर देऊ

धंगेकर ब्लॅकमेलर, प्रसिद्धीसाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न; पाटलांच्या आरोपांवरून भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा खोडसाळपणा पुणेकरांना माहिती आहे. ते ब्लॅकमेलर असून, प्रसिद्धी मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ते सुसंस्कृत असलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा आरोप भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला.
कोथरूडमधील गुन्हेगारांना चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद असून, त्यांच्या कार्यालयातील पाटील नावाची व्यक्ती गुंड नीलेश घायवळसह इतर गुन्हेगारांच्या संपर्कात असते. पोलिसांनी त्याचा सीडीआर तपासला तर नीलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी कोणी मदत केली हे स्पष्ट होईल. मात्र, पोलिस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पावले उचलत नाही, असा आरोप कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर घाटे यांनी भाजप शहर कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना धंगेकर यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेला आरोप बिनबुडाचा आणि व्यक्तिगत आकसापोटी केलेला आहे. धंगेकर प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. महायुती हा अलोटसागर असून, फेविकोलचा मजबूत जोड आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात योग्य समन्वय आहे. धंगेकरांनी चुकीचे विधान केल्याने महायुतीमध्ये तणाव निर्माण होणार नाही. त्यांनी काल-परवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पक्ष बदलल्याचे भान नाही. वारंवार पक्ष बदलणारे अशी त्यांची प्रतिमा आहे. पुणेकरांनी त्यांना लोकसभेला नाकारले, कसब्यातील मतदारांनी त्यांना विधानसभेला नाकारले. चंद्रकांत पाटील हे राज्याचे नेते आहेत. जनतेने त्यांना लाखाच्या मतांनी निवडून दिले आहे. अशा पद्धतीने चारित्र्यवान नेत्यावर आरोप करून ते टीआरपी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
मुळात धंगेकर चुकीचे बोलतात, ते ब्लॅकमेलर आहेत, त्यांचा खोडसाळपणा पुणेकरांना माहिती आहे. बोलायचे व नंतर मूग गिळून गप्प बसायचे, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या भवताली कोण असतात, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शहाणपणा शिकवण्याचे काम नाही. दरम्यान, धंगेकरांच्या मागे उपमुख्यमंत्री शिंदे असतील, असे मला वाटत नाही. धंगेकर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना समजेल अशा भाषेत आम्हीही उत्तर देऊ, त्यांना समज देणे हे त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे काम आहे, असेही घाटे म्हणाले.