ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:39 IST2025-09-26T13:38:04+5:302025-09-26T13:39:54+5:30
पोलिसांनी १७८ लिटर हातभट्टी व ६०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन व इतर असा ४९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला आहे

ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल
पुणे: अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवत पोलिसांनी ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल केले आहेत. अवैधरीत्या सुरू असणाऱ्या धंद्यांवर कठोर कारवाई करून समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले होते. पोलिसांनी १७८ लिटर हातभट्टी व ६०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन व इतर असा ४९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला आहे.
बुधवारी (दि. २४) पहाटे पासून मासरेडचे आयोजन करून परिमंडळ ४ च्या हद्दीमध्ये लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या एकूण १३ लोकांवर ११ गुन्हे दाखल करून ४९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला. त्यात १७८ लिटरचे १६ हजार ३०० रुपयांचे गावठी हातभट्टी तयार दारू व २८ हजार रुपये किमतीचे ६०० लिटर कच्चे रसायन व इतर मालाचा समावेश आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी १८ पोलिस अधिकारी, ६० पोलिस अंमलदारांद्वारे ही मोहीम राबवण्यात आली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी प्रांजली सोनवणे, विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली.