ब्युटीपार्लरच्या कामाला लावतो सांगत वेश्याव्यवसायात ढकलले; डांबून ठेवले, मारहाण केली, दलाल अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:49 IST2025-10-11T17:49:18+5:302025-10-11T17:49:34+5:30
ब्युटीपार्लरच्या कामाला न लावता या तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, त्यातून मिळणारे पैसे स्वत:साठी वापरले

ब्युटीपार्लरच्या कामाला लावतो सांगत वेश्याव्यवसायात ढकलले; डांबून ठेवले, मारहाण केली, दलाल अटकेत
पुणे: ब्युटीपार्लरच्या कामाला लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून वेश्याव्यवसायाला लावलेल्या दोन तरुणींची भारती विद्यापीठ पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. दोन वर्षे छळ सहन केल्यानंतर संधी मिळताच पीडितेने पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. त्यावरून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. राजू चिद्रवार (पाटील) (२५, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा राजू चिद्रवार ही पळून गेली असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ पासून आतापर्यंत बुधवार पेठ, आंबेगाव पठार, आळंदी येथील लॉजवर घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू चिद्रवार व मीरा चिद्रवार यांनी फिर्यादी यांना ब्युटीपार्लरचे काम लावून देते, असे आमिष दाखवून पश्चिम बंगालमधील गावावरून पुण्यात आणले. ब्युटीपार्लरच्या कामाला न लावता या तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यातून मिळणारे पैसे स्वत:साठी वापरले. तिला त्यांनी डांबून ठेवले. शिवीगाळ, मारहाण करुन धमकावले, तिचा छळ केला. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार येथे त्यांनी आणखी एका तरुणीला तेथे आणले. तिच्याकडूनही ते वेश्याव्यवसाय करवून घेत होते. या तरुणीला संधी मिळताच तिने पोलिस कंट्रोल रूमला फोन केला. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी आंबेगाव पठार येथे शोध घेऊन फिर्यादी व तिच्याबरोबर आणखी एका तरुणीची सुटका केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे पुढील तपास करत आहेत.