पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर शाळेला जागतिक पुरस्काराने सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:33 IST2025-10-03T19:32:52+5:302025-10-03T19:33:22+5:30
हा पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर शाळेला जागतिक पुरस्काराने सन्मान
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर प्राथमिक शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील टी फोर एज्युकेशन संस्थेकडून प्रतिष्ठित वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज कम्युनिटी चॉइस अवॉर्ड मिळवून जागतिक पातळीवर मान मिळवला आहे. शाळेच्या नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती, प्रेरणादायक मार्गदर्शन, उत्कृष्ट सोयी-सुविधा आणि नैतिक मूल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वक्षमता यासारख्या गुणांचा विकास झाला, ज्यामुळे ही शाळा जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाची ठरली.
टी फोर एज्युकेशन संस्थेने आज या पुरस्काराची घोषणा केली. जालिंदरनगर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक नवकल्पना, सामाजिक प्रभाव आणि विद्यार्थी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. या पुरस्कारासाठी जगभरातून मानांकने मागवण्यात आली होती, आणि जालिंदरनगर शाळेला सर्वाधिक पाठिंबा मिळाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, “हा पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या गुणवत्तेमुळे पुणे जिल्ह्याचा आणि जालिंदरनगर शाळेचा नावलौकिक केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतीय उपखंडातही पोहोचला आहे.”
जालिंदरनगर शाळेत सहअध्ययन मॉड्यूल लागू करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध वयोगटांतील विद्यार्थी एकमेकांना शिकवतात आणि शिकतात. या क्रांतिकारी शैक्षणिक बदलामुळे शाळेची गुणवत्ता आणि प्रभाव वाढला आहे. गजानन पाटील यांनी या प्रकल्पात सहभागी असलेल्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “जिल्हा परिषद ही गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे.” हा पुरस्कार जालिंदरनगर शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि सामाजिक योगदानाचा पुरावा आहे, ज्यामुळे पुणे जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
अबुधाबी येथे पुरस्काराचे वितरण
टी फोर एज्युकेशन संस्थेच्यावतीने १५ आणि १६ नोव्हेंबरला अबुधाबी येथे वर्ल्ड स्कूल समिट होणार असून, त्यामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. एक कोटी रुपयांचे बक्षीस आहे. ते स्वीकारण्यासाठी दत्तात्रय वारे यांच्यासह शिक्षक जाणार आहेत.