पुणे: शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे परिसरातील महामार्ग व पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे परिसरातील १ लाख १० हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम तीन टप्प्यांत होणार असून, यामध्ये पुणे ते शिरूर या पहिल्या टप्प्यातील ५४ किलोमीटर उन्नत महामार्गाच्या कामाचे महिनाभरात उद्घाटन करण्यात येइल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
पुण्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), महामेट्रो, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ (एमएसआयडीसी) तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असल्याने हे प्रकल्प राबवले जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
पुणे ते शिरूर हा ५३.४ किलोमीटर लांबीचा उन्नत महामार्ग सुमारे ७,५१५ कोटी रुपयांत उभारला जाणार आहे. या मार्गावर जमिनीवर रस्ता, त्यावर सहा लेनचा उन्नत महामार्ग आणि सर्वात वर मेट्रो अशी रचना प्रस्तावित आहे. तसेच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १९२.५ किलोमीटर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे उभारण्यात येणार असून, त्यासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे पुणे ते संभाजीनगर प्रवास सुमारे २ तास १५ मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हडपसर ते यवत दरम्यान ३१.५ किलोमीटर उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, त्यासाठी ५,५८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा ५४ किलोमीटर लांबीचा मार्ग एनएच - ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावर विकसित करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रमुख चार महामार्ग प्रकल्प
-पुणे-शिरूर उन्नत महामार्ग : ५३.४ किमी, अंदाजित खर्च ७,५१५ कोटी-शिरूर-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे : १९२.५ किमी, खर्च १५,००० कोटी-हडपसर-यवत उन्नत मार्ग : ३१.५ किमी, खर्च ५,५८६ कोटी-तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग विकास : ५४ किमी, खर्च सुमारे ४,००० कोटी
इतर महत्त्वाचे निर्णय
-नाशिक फाटा-खेड पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पाला लवकरच सुरुवात.-प्रकल्पाची किंमत सुमारे ७,८०८ कोटी रुपये, ९० टक्के भूसंपादन पूर्ण.-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला समांतर नवीन ग्रीनफिल्ड मार्ग प्रस्तावित.-भविष्यात मुंबई-पुणे प्रवास ९० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता.-लोणावळा परिसरातील ‘मिसिंग लिंक’ बोगदा प्रकल्प मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा.
पालखी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून, दिवे घाटातील काम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. लवकरच पाहणी करून या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मे अखेरपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Web Summary : Nitin Gadkari announced ₹1.1 lakh crore projects for Pune, including the Pune-Chhatrapati Sambhajinagar highway in three phases. Pune-Shirur elevated highway work will start soon. Other projects include Hadapsar-Yavat elevated road and Talegaon-Chakan-Shikrapur road development. Mumbai-Pune travel time may reduce to 90 minutes in the future.
Web Summary : नितिन गडकरी ने पुणे के लिए ₹1.1 लाख करोड़ की परियोजनाओं की घोषणा की, जिसमें पुणे-छत्रपति संभाजीनगर राजमार्ग तीन चरणों में शामिल है। पुणे-शिरूर एलिवेटेड हाईवे का काम जल्द शुरू होगा। अन्य परियोजनाओं में हडपसर-यवत एलिवेटेड रोड और तलेगांव-चाकण-शिक्रापुर सड़क विकास शामिल हैं। भविष्य में मुंबई-पुणे की यात्रा का समय 90 मिनट तक कम हो सकता है।