Pune Accident News: गणेशोत्सवामुळे सगळीकडे लगबग सुरू असून, शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. नागरिक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडलेले असतानाच पुण्यातील लक्ष्मी रोडवर थरारक घटना घडली. पीएमपीएलची बस लक्ष्मी रोडवरील गर्दीतून जात असताना अचानक चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला. पण, वेळीच पोलीस चालकाच्या मदतीला धावल्याने पुढचा सगळा अनर्थ टळला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यातील लक्ष्मी रोडवर सोमवारी (२५ ऑगस्ट) रात्री ही घटना घडली. गणेशोत्सवामुळे लक्ष्मी रोडवर खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यातच सोमवारी रात्री वर्दळ असताना पुणे स्थानक ते कुंबरे पार्क (ही कोथरूड डेपोची बस) लक्ष्मी रोडवरील सीटी पोस्ट ऑफिसजवळ आली.
...अन् बस चालकाला आला ह्रदयविकाराचा झटका
चालक अनिल अंबुरे हे पीएमपीएलची बस चालवत होते. बस पोस्ट ऑफिसजवळ आलेली असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. बस चालत असताना अनिल अंबुरे अचानक बेशुद्ध पडल्याने बसमध्ये गोंधळ उडाला. प्रवाशी घाबरून ओरडू लागले.
बसमधील प्रवाशांचा ओरडण्याचा आवाज ऐकून बेलबाग चौकात ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल रमेश ढावरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना निमगिरे हे बसच्या दिशेने धावले. बसमध्ये चढत त्यांनी चालकाला उचलले आणि फूटपाथवर झोपवले.
ढावरे यांनी चालक अनिल अंबुरे यांना तातडीने सीपीआर देण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळात ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना रिक्षाने तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात तर टळलाच, पण चालक अनिल अंबुरे यांचा जीवही वाचला.