Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:28 IST2025-06-14T15:27:43+5:302025-06-14T15:28:07+5:30

तिन्ही घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरटयांनी चोरून नेले

Pune: Three incidents of house burglary in Pune Property worth Rs 27 lakh stolen | Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला

Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला

पुणे: शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरात शुक्रवारी (दि. १३) दाखल घरफोडीच्या तीन घटनांमध्ये २६ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पहिल्या घटनेत, रविवार पेठेतील रामलीला ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान चोरांनी गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री फोडले. दुकान मालक राजीव खताळ (३५, रा. कोंढवा खुर्द) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हिऱ्याचे दागिने व रोख रक्कम, असा १४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हाळे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, कांता चौधरी (६२, रा. शिवकृपा निवास, लेन नं. ३, साठे वस्ती, लोहगाव, धानोरी रोड) यांच्या घरातील कपाटात ठेवलेले लक्ष्मी मूर्ती, सोन्याचे दागिने, लेडीज घड्याळ व रोख रक्कम, असा ४३ हजारांचा ऐवज ११ ते १३ जूनदरम्यान चोरीला गेला. याप्रकरणी चौधरी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार आदलिंग करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत, तुषार गुप्ता (३१, रा. तत्त्व सोसायटी, चंदननगर) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. १३) मध्यरात्री एक ते पहाटे चारच्या सुमारास त्यांचे घर बंद असताना, चोरांनी घराच्या मुख्य दरवाजाचे नुकसान करून, दरवाजा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती व रोख रक्कम, असा ११ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Pune: Three incidents of house burglary in Pune Property worth Rs 27 lakh stolen