पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका, अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:48 IST2025-11-19T13:47:17+5:302025-11-19T13:48:27+5:30
शेकोट्या पेटविल्यामुळे हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो, त्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे

पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका, अन्यथा महापालिका करणार दंडात्मक कारवाई
पुणे : शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लॅस्टिक, रबर किंवा कचरा जाळून शेकोटी करून हवा प्रदूषण केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. कोळसा, जैविक पदार्थ, प्लॅस्टिक, रबर किंवा कचरा जाळल्यानंतर केवळ हवा प्रदूषण होते, असे नाही तर याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होतो. शेकोट्या पेटविल्यामुळे धूर, कार्बन मोनोऑक्साइड पीएम १०, पीएम २.५ आणि अन्य हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. त्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हवेची गुणवत्तेत राखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. त्यानुसार उघड्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लॅस्टिक, रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई आहे.
सध्या थंडीचे दिवस असल्याने शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचारी थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोट्या पेटवतात. यामध्ये लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळला जातो. यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे शहरातील हवा प्रदूषण वाढते. त्यामुळे वॉचमन, सफाई कामगार, इतर कामगार, व्यक्ती, महापालिका कर्मचारी, कंत्राटी कामगार किंवा महापालिका ठेकेदाराचे कंत्राटी कामगार यांसह इतरांनी शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर कोळसा, जैविक पदार्थ, प्लॅस्टिक, रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केल्यास किंवा शेकोटी पेटवून हवा प्रदूषण केल्यास संबंधितांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.