पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच, तीन महिन्यांत ६२ तर वर्षभरात अपघातात ११९ पादचाऱ्यांचा मृत्यू

By राजू हिंगे | Updated: April 11, 2025 11:41 IST2025-04-11T11:40:02+5:302025-04-11T11:41:26+5:30

पुणे शहरात २०२३ या वर्षभरात झालेल्या अपघातात ३५० नागरिकांचा मृत्यू झाला

Pune remains unsafe for pedestrians, 62 pedestrians die in three months | पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच, तीन महिन्यांत ६२ तर वर्षभरात अपघातात ११९ पादचाऱ्यांचा मृत्यू

पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षितच, तीन महिन्यांत ६२ तर वर्षभरात अपघातात ११९ पादचाऱ्यांचा मृत्यू

पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील ८२६ किलोमीटरचे रस्ते विनापदपथ आहेत. सुमारे ५७४ किलोमीटरच्या रस्त्यावर पदपथ असले तरी त्यातील निम्म्याहून अधिक पदपथ अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहेत. या वाढत्या अतिक्रमणांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, गेल्या वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या वर्षातील तीन महिन्यात जानेवारीपासून ५९ अपघातांमध्ये ६२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यावरून पादचाऱ्यांसाठी पुणे असुरक्षित बनत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवड्यात उंड्री येथे ४९ वर्षीय सुजितकुमार सिंग मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना कारने धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पादचारी सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात सुमारे १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहरातील रस्ते हे महापालिकेच्या मालकीचे आहेत. शहरात रस्ते तयार करताना नागरिकांना पायी चालता यावे, तसेच कुठल्याही अडथळ्याविना चालता यावे, यासाठी पदपथ तयार केले. पण, अनेक पदपथावर पथारी व्यावसायिक, हातगाडी, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. अनेक दुकानदार, कार्यालयातील कर्मचारी पदपथावरच दुचाकी, चारचाकी वाहने उभी करतात. महापालिकेने शहराच्या विविध भागांतील पदपथावर नागरिकांनी दुचाकी वाहने चालवू नयेत. अतिक्रमण करू नये, यासाठी सिमेंटचे ठाेकळे बसविले आहेत. पण, अनेक ठिकाणच्या पदपथावरील सिमेंटचे ठोकळे ताेडण्यात आले आहेत. त्यामुळे पदपथावरून दुचाकीधारक बिनधास्तपणे वाहने चालवतात.

वर्षभरात ११९ पादचाऱ्यांचा मृत्यू

पुणे शहरात २०२३ या वर्षभरात झालेल्या अपघातात ३५० नागरिकांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराचे मृत्यू सर्वात जास्त म्हणजे १९२ आहे. त्या खालाेखाल पादचाऱ्यांचे १२० मृत्यू झाले आहेत. पादचाऱ्यांच्या अपघाताच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०२२ मध्ये अपघातामध्ये पादचाऱ्यांचे १०६ मृत्यू झाले होते. प्रामुख्याने रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या वाहनाने दिलेली धडक आणि पाठीमागून आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना दिलेली धडक या दोन कारणांमुळे अधिक अपघात होत आहेत. या वर्षभरात म्हणजे २०२५मध्ये जानेवारीत १२, फेब्रुवारी १५ आणि मार्चमध्ये ३५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
 
पादचारी सिग्नल पाळत नाहीत !

शहरातील रस्त्यांवर वाहनाबरोबरच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी सिग्नलमध्ये वेळ दिलेला असतो. पण, अपवाद वगळता तो कोणीही पाळताना दिसत नाही. काही ठिकाणी तर चौकातील वाहतूक पोलिस पादचाऱ्यांसाठी असलेल्या वेळेत वाहने पुढे जाण्यास सांगतात. वाहनांना पुढे पाठवून चौक मोकळा करण्याकडे वाहतूक पोलिस महत्त्व देताना दिसतात.

हे आहेत नियम

शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर पदपथ आहेत; पण काही रस्त्यांवर ते तुटक स्वरूपात आहेत. नियमानुसार पदपथाची रुंदी किमान १.८ मीटर आणि रस्त्यापासून १५० मिमी उंच असणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या पातळीनुसार अपवादात्मक परिस्थितीत नियमापेक्षा उंच असल्यास रॅम्प किंवा पादचाऱ्यांची रचना करण्यात येते.

पादचारी सुरक्षितता धोरण कागदावरच

महापालिकेने मोठा गाजावाजा करून ‘पादचारी सुरक्षितता धोरण’ आठ वर्षांपूर्वीच तयार केले होते. त्यात शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन या धोरणात पादचाऱ्यांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. पादचाऱ्यांना कमीत कमी वेळेत रस्ता ओलांडता यावा यासाठी पादचारी मार्गाची निर्मिती, प्रमुख रस्त्यांवर पुरेशा जागांची उपलब्धता, अशा बाबी या धोरणात आहे. पादचाऱ्यांसाठी धोरण तयार करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. पण, या धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही.

‘पादचारी रस्त्यांवरून चालत असतील तर पदपथाचे डिझाइन कुठेतरी चुकले असणार’ ही खूणगाठ मनाशी बांधून असे पदपथ सुधारले पाहिजेत. पदपथांवर योग्य प्रमाणात, सुनियोजित जागा देऊन, पादचाऱ्यांना सोयीस्कर असलेले पदपथ बनवणे अत्यावश्यक आहे.  - हर्षद अभ्यंकर, संचालक, सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट 

Web Title: Pune remains unsafe for pedestrians, 62 pedestrians die in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.