Pune rain news : जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी, सात धरणे काठोकाठ; जिल्हा प्रशासनाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:37 IST2025-08-20T13:37:07+5:302025-08-20T13:37:34+5:30
जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारा पूरग्रस्त भाग, तसेच दरडप्रवणग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

Pune rain news : जिल्ह्यात सात मंडळांत अतिवृष्टी, सात धरणे काठोकाठ; जिल्हा प्रशासनाची माहिती
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मुळशी, मावळ व भोर तालुक्यांमध्ये एकूण सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात मुळशीतील चार, मावळातील दोन व भोरमधील एका मंडळाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील २६ पैकी ७ धरणे काठोकाठ भरली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारा पूरग्रस्त भाग, तसेच दरडप्रवणग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक आयोजिली होती, यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप गिल, तसेच अन्य विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, “भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारीही (दि. २०) घाटमाथा परिसरात रेड अलर्ट, तर शहर आणि ग्रामीण भागात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जी धरणे भरली आहेत त्या ठिकाणी जलसंपदा व शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने पावसाचा अंदाज आणि त्यांना धरणातील आवक लक्षात घेता विसर्गाबाबत नियोजन करावे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घ्यावी.”
दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी झालेल्या पावसामुळे मावळ व मुळशी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यात मुळशी तालुक्यातील माले, मुठा, सावरगाव व कोळवण, तर मावळ तालुक्यातील कार्ला, लोणावळा, तसेच भोर तालुक्यातील भोर मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात मुळशी, मावळ या तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांमध्ये तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. पुणे शहर व हवेली, पुरंदर तालुक्यांत मंगळवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवारी एकूण १३५ मिलिमीटर, तर मंगळवारी ४२८ मिलिमीटर पाऊस झाला.
धरणांतही पाणीसाठा वाढला
जिल्ह्यातील २६ धरणांपैकी सात धरणे शंभर टक्के भरली असून, विसापूर धरण ९९.३९, पवना ९९.१५, तर नीरा देवघर धरण ९७.८५ टक्के भरले आहे. माणिकडोह धरणात आतापर्यंत केवळ ४४.१५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, येडगाव धरणात ७० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. चिल्हेवाडीत ७७, गुंजवणीत ८१ टक्के पाणीसाठा असून उर्वरित सर्व धरणांमध्ये ९० टक्क्यांवर पाणीसाठा झाल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच कसबा पेठेतील एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. तर भोरमधील अंबाडे घाटात दरड कोसळली. मात्र, ती हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरी २४७.४ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत जिल्ह्यात १११.७ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ४५ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ दिवस पाऊस झाला आहे.खडकवासला धरणातून सध्या ३५ हजार ५७४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट परिसरातील पावसाच्या प्रमाणाप्रमाणे हा विसर्ग कमी जास्त होऊ शकतो.
सध्या आणि पुढील काही काळात धरणानंतरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने तेथून अनेक ओढ्यांतून पाण्याचे प्रवाह नदीत येत आहेत. या मुक्त पाणलोट क्षेत्रातील प्रवाहांमुळे नदीतून प्रत्यक्ष शहरात येणारा प्रवाह धरणाच्या विसर्गापेक्षा बराच जास्त असू शकतो आणि त्यामुळे पूरपातळ्या अजून वाढू शकतात. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी ही परिस्थिती गृहीत धरून त्या प्रमाणे सर्व उपाययोजना कराव्यात. - श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प