पुणे: मध्य रेल्वे विभागातील विविध स्थानकांवर रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर वारंवार कारवाई करण्यात येते. तरीही फुकटे काही कमी होताना दिसत नाहीत. मध्य रेल्वे विभागात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल ३८ लाखांहून अधिक फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने २२७ कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये पुणे विभागात चार लाख ३१ हजार फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करून २७ कोटी १४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागासह पुणे, सोलापूर, नागपूर व भुसावळ विभागांत तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. विशेषतः लोकल रेल्वे, एक्स्प्रेस व मेल गाड्यांमध्ये तिकीट तपासणी वाढविण्यात आली असून, तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवास सुलभतेचा गैरफायदा घेत काही प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करीत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेता, विशेष तपासणी पथके, अचानक धाडसत्रे आणि स्थानकांवर तपासणी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की, तिकीट काढूनच प्रवास करावा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. आगामी काळात तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी तपासणी आणखी कडक करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक फुकटे
फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून वारंवार कारवाई करण्यात येते, तरीही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अकरा महिन्यांत सर्वाधिक १६ लाख १६ हजार फुकटे मुंबई विभागात सापडले आहेत. पुणे विभागातून ४ लाख ३१ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २७ कोटी १४ लाख इतका दंड वसूल केला आहे. सर्वांत कमी फुकटे सोलापूर विभागात सापडले आहेत.
विभाग --- फुकटे प्रवासी -- दंडमुंबई : १६.१६ लाख - ७१.३२ कोटीपुणे : ४.३१ लाख - २७.१४ कोटी
भुसावळ : ८.९४ लाख -७५.२९ कोटीनागपूर : ४.०० लाख - २४.९३ कोटी
सोलापूर : २.३० लाख - १०.५३ कोटीमुख्यालय : २.२८ लाख - १७.८२ कोटी
रेल्वेतून फुकट प्रवास करणे, हे कायद्याने गुन्हा आहे. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. जेणेकरून प्रवासात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. गडबडीत तिकीट काढणे विसरले तरी तिकीट तपासणीसकडून तिकीट काढून प्रवास करणे सोयीचे ठरेल.- आनंद सप्तर्षी, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती
Web Summary : Pune Railway Division penalized over four lakh ticketless travelers, collecting ₹27.14 crore in fines. Across Central Railway, ₹227 crore was recovered from 38 lakh offenders. Mumbai division had the most cases. Increased checks aim to curb revenue loss; passengers are urged to buy tickets.
Web Summary : पुणे रेल मंडल ने चार लाख से अधिक बिना टिकट यात्रियों पर जुर्माना लगाकर 27.14 करोड़ रुपये वसूले। मध्य रेलवे में 38 लाख अपराधियों से 227 करोड़ रुपये वसूले गए। मुंबई मंडल में सबसे ज्यादा मामले थे। राजस्व हानि को रोकने के लिए जाँच बढ़ाई गई; यात्रियों से टिकट खरीदने का आग्रह किया गया।