पुणे : पुणे कारागृह पोलिस भरतीसाठी ५१३ जागांसाठी १ मार्च २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या भरतीसाठी सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. मात्र, जाहिरात प्रसिद्ध होऊन दहा महिने उलटून गेले तरीही कारागृह प्रशासनाकडून मैदानी चाचणी किंवा लेखी परीक्षेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच आता गृहमंत्री यांच्याकडून नवीन पोलिस भरतीत ८५० पदे भरणार असल्याची घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली आहे. मैदानी चाचणीसाठी सराव तसेच लेखी परीक्षेची तयारी करण्यात त्यांचा प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची झाली आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, १७ जानेवारी रोजी गृहमंत्री यांनी पुण्यात नवीन पोलिस भरतीत ८५० पदे भरणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साडेसात हजार जागा भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, २०२२-२३ मधील पुणे कारागृह पोलिस भरती अद्याप रखडलेली आहे.
राज्यातील इतर पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रेही देण्यात आली. मात्र, पुणे कारागृह पोलिस भरतीचा अजूनही ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना २०२२-२३ च्या भरतीसाठी तयारी सुरू ठेवावी की नव्या भरतीच्या प्रतीक्षेत राहावे, हा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची मागणी आहे की प्रशासनाने या प्रक्रियेबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात; जेणेकरून त्यांची मेहनत व्यर्थ जाणार नाही. प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.